सावंतवाडी: कणकवली नगरपंचायत निवडणुकीत झालेल्या कथित ‘लक्ष्मी दर्शना’चे पडसाद आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच उमटू लागले आहेत. “शहरातील मतदारांना १५ हजार देणाऱ्यांनी ग्रामीण मतदारांवर अन्याय करू नये,” अशा आशयाचा उपरोधिक बॅनर कणकवली जवळील महामार्गावर हळवल फाट्यावर झळकला असून, याची संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमका प्रकार काय?
नुकत्याच झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत कमालीची चुरस पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला १० ते २५ हजार रुपयांपर्यंत वाटप झाल्याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात आणि जनमानसात होती. जरी या पैसे वाटपाचे कोणतेही ठोस पुरावे समोर आले नसले, तरी निवडणुकीतील या ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराची चर्चा अजूनही थांबलेली नाही.
याच चर्चेचा धागा पकडून आता काही अज्ञात व्यक्तींनी कणकवली तालुक्यातील हळवल फाट्यावर एक बॅनर लावला आहे. या बॅनरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मतदारांची बाजू मांडताना राजकीय पक्षांना एक प्रकारे टोला लगावण्यात आला आहे.
बॅनरमधील मजकूर चर्चेत
या बॅनरवर प्रामुख्याने असे म्हटले आहे की, जर शहरी भागातील मतदारांना निवडणुकीसाठी मोठी रक्कम दिली जात असेल, तर ग्रामीण भागातील मतदारांना त्यापासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करू नये. लोकशाहीच्या या उत्सवात पैशांचा उघड वापर होत असल्याचे या बॅनरमधून अप्रत्यक्षपणे अधोरेखित करण्यात आले आहे.
लोकशाहीची थट्टा की इशारा?
निवडणुकीत होणारा पैशांचा वापर हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. मात्र, अशा प्रकारे उघडपणे बॅनर लावून पैशांची मागणी करणे किंवा त्या व्यवहाराची आठवण करून देणे, हा प्रकार लोकशाहीची थट्टा उडवणारा असल्याचे मत सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. हा बॅनर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकीय पक्ष आता कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
