घटस्फोटानंतर दुसरं लग्न केल्यामुळे जात पंचायतीने एका ३५ वर्षीय महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा दिली. महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. जात पंचायतीने या महिलेला तिच्या कृत्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड भरण्याची शिक्षाही दिली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मात्र, या महिलेले हिंमत करुन या दोन्ही शिक्षा नाकारल्या आणि या प्रकाराविरुद्घ पोलिसात तक्रार दाखल केल्याचं कळत आहे. ही घटना गेल्या महिन्यात घडली आहे. मात्र या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. जळगावमध्ये राहणाऱ्या या महिलेच्या फिर्यादीवरुन जात पंचायतीच्या १० सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. जळगावच्या चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही महिला या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी आहे. त्यानंतर हे प्रकऱण जिथे ही घटना घडली तिथल्या म्हणजेच अकोल्यातल्या पिंजर पोलीस स्टेशनमध्ये दाखल कऱण्यात आलं आहे.

या तक्रारीनुसार, ही घटना अकोला जिल्ह्यातल्या वडगाव या गावात ९ एप्रिल रोजी घडली. या महिलेने दुसरं लग्न केल्यामुळे ही जात पंचायत भरवण्यात आली होती. ही महिला नाथ जोगी समाजातली आहे आणि या समाजाच्या जात पंचायतीने तिचं दुसरं लग्न मान्य केलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सदर महिलेने २०१५मध्ये लग्नाच्या चार वर्षांनंतर आपल्या पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता आणि त्यानंतर तिने २०१९ साली दुसरं लग्न केलं. जात पंचायतीच्या या सभेमध्ये तिची बहीण आणि इतर नातेवाईकांना बोलावण्यात आलं आणि या प्रकऱणाचा ‘निकाल’ देण्यात आला. या जात पंचायतीच्या ‘निकाला’नुसार, जात पंचायतीचे सर्व सदस्य एका केळीच्या पानावर थुंकतील आणि त्या महिलेला हे चाटावं लागेल, तसंच या महिलेला एक लाख रुपयांचा दंडही जात पंचायतीकडे भरावा लागेल, अशी शिक्षा तिला देण्यात आली. ही शिक्षा भोगल्यानंतरच तिला तिच्या समाजामध्ये परत स्वीकारण्यात येईल असं सांगण्यात आलं.

महिलेल्या नातेवाईकांनी तिला या घडल्या प्रकाराची माहिती दिली. हे कळल्यानंतर तिने त्वरीत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकाराचा अधिक तपास सुरु आहे.