माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना सीबीआय न्यायलायकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पाटणकरांशी संबंधित ८४.६ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास थांबवण्याबाबतचा अहवाल सीबीआय न्यायालयाने मंजूर केला आहे. फसवणूक प्रकरणाशी संबंधित सबळ पुरावे उपलब्ध नसल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

किरीट सोमय्या यांचा आरोप
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट करून राज्य सरकारवर खोचक टीका केली होती. “उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं कारवाई केली आहे. शेल कंपन्यांच्या माध्यमातून हा घोटाळा झाला असून त्यासंदर्भात ईडीनं मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. घोटाळेबाजांना सोडणार नाही”, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं होतं. श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम कंपनी आहे. यात मनी लॉड्रिंग करून पैसे आले आहेत. यात २९ कोटी काळा पैसा गुंतवला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच या कंपनीचा आणि उद्धव ठाकरेंचा काय संबंध? हे ठाकरेंनी स्पष्ट करावे, अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती.

काय आहे प्रकरण ?

पुष्पक ग्रुपची एक कंपनी असलेल्या पुष्पक बुलियनच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिडेटनं खरेदी केलेल्या ११ सदनिका ताब्यात घेण्यात आल्या होत्या. साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे. याआधी ईडीनं पुष्पक बुलियन आणि ग्रुप ऑफ कंपनीजविरोधात ६ मार्च २०१७ रोजी आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच, याआधीच ग्रुपच्या मालकीची २१ कोटी ४६ लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त करम्यात आली होती.

निलांबरी अपार्टमेंट

पुष्पक ग्रुपशी संबंधित महेश पटेल यांनी पुष्पक ग्रुपशी संबंधित २०.०२ कोटींचा निधी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या शेल कंपन्यांकडे ट्रान्सफर केला. त्यांनी पुढे एकूण ३० कोटींचा निधी त्यांची अजून एक शेल कंपनी हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून असुरक्षित कर्ज स्वरूपात श्री साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिडेटकडे ट्रान्सफर केला. त्यामुळे महेश पटेल यांच्याकडून आलेला निधी साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून रीअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आला. याच पैशातून ठाण्याच्या निलांबरी अपार्टमेंटमधील ११ सदनिका खरेदी करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.

शिवसेनेकडून स्पष्टीकरण

तर पाटणकर हे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय दबाब टाकण्याासाठी हे कृत्य केलं जात असून आम्ही कोणत्याही दबावाल बळी पडणार नाही अशी भूमिका शिवसेने व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले होते.