देशभरात सध्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रात आणि विशेषतः लातूरमध्ये वेगाने पोहोचले आहेत. या प्रकरणात आता एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर आली असून, केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे पथक गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडून आहे. दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने मोटेगावकर यांच्या शिकवणी वर्गाच्या कार्यालयावर छापा टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर रविवारी दुपारी २ वाजल्यापासून शिवराज मोटेगावकर यांची कसून चौकशी सुरू होती. अखेर दीर्घ चौकशीनंतर सीबीआयने ही मोठी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. शिवराज मोटेगावकर हे शैक्षणिक वर्तुळात मोठे नाव असून लातूर, पुणे आणि नांदेड येथे त्यांच्या आरसीसी क्लासेसच्या शाखा आहेत.
शिवराज मोटेगावकर यांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल!
शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर, आता त्यांचा काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ या वर्षीची नीट परीक्षा संपल्यानंतरचा आहे, ज्यामध्ये मोटेगावकर परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये ते विद्यार्थ्यांना विचारत आहेत की, “आरसीसीच्या मॉक टेस्ट सिरीजमधून प्रश्न आले होते का?” यावर उत्तर देताना एक विद्यार्थिनी सांगते की, “हो, आपल्या टेस्ट सिरीजच्या बाहेरील एकही प्रश्न आला नव्हता.” व्हिडिओमध्ये पुढे एक विद्यार्थी अत्यंत धक्कादायक प्रतिक्रिया देताना दिसतो. तो म्हणतो, “सर, तुम्ही जे १०१ प्रश्न दिले होते, त्याच प्रश्नांमधून परीक्षेत प्रश्न आले होते.” यावर मोटेगावकर अत्यंत आत्मविश्वासाने, “आरसीसीचे पेपर मोर दॅन सफिशियंट (गरजेपेक्षा जास्त) आहेत,” असे सांगताना दिसत आहेत.
पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ समोर आल्याने पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीबीआय आता या सगळ्याची कसून चौकशी करत असून, या प्रकरणात आणखी कोणते मोठे मासे गळाला लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत प्रा. शिवराज मोटेगावकर ?
प्रा. शिवराज मोटेगावकर हे लातूरमधील ‘रेणुका केमिस्ट्री क्लासेस’चे संचालक आणि महाराष्ट्रातील नामांकित शिक्षक आहेत. त्यांनी नांदेडमधून रसायनशास्त्र (Chemistry) विषयात पदव्युत्तर पदवी घेत अव्वल क्रमांक पटकावला होता. सुरुवातीच्या काळात नोकरी न मिळाल्याने त्यांनी घरगुती शिकवणी (ट्यूशन) घेण्यास सुरुवात केली, ज्याचे पुढे मोठ्या कोचिंग क्लासमध्ये रूपांतर झाले.
मोटेगावकर यांनी लातूरच्या पारंपारिक शिक्षण पद्धतीला कॉर्पोरेट स्वरूप दिले. त्यांनी केवळ रसायनशास्त्रच नव्हे, तर भौतिकशास्त्र (Physics) आणि जीवशास्त्र (Biology) हे विषयही एकाच छताखाली आणले. आज त्यांच्या कोचिंग ब्रँडचा विस्तार लातूरसह नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, अकोला, कोल्हापूर आणि नाशिक अशा अनेक शहरांमध्ये झाला आहे. त्यांच्या या मोठ्या शैक्षणिक साम्राज्यात शिक्षक, व्यवस्थापक आणि सुरक्षारक्षकांसह मोठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून, शिक्षकांना लाखांमध्ये वेतन दिले जाते.
गुणवत्तेच्या शर्यतीत जिथे लातूरमधील इतर क्लासेसमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शिक्षक शिकवत आहेत, तिथे मोटेगावकर हे कपाळाला टीळा लावणारा ‘मराठी चेहरा’ म्हणून ओळखले जातात. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणाशी त्यांचे नाव जोडले गेल्याने ते सध्या प्रचंड वादात सापडले असून, त्यांच्या शैक्षणिक साम्राज्याविषयी पालकांमध्ये शंका निर्माण झाली आहे.
