नागपूर खंडपीठाचा आदेश

नागपूर : इंडोनेशिया, नायजेरियातून होणाऱ्या सुपारीच्या अवैध तस्करीमुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान होते. सडकी सुपारी देशात येऊ नये, यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. या प्रकरणाची व्याप्ती राष्ट्रीय स्तरावरील असल्याने त्याचा तपास केंद्रीय गुप्तचर खात्याकडे (सीबीआय) सोपवावा असा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. या आदेशामुळे देशभरातील सुपारी तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

विदेशातून सुपारी आयात करण्यासाठी १०३ टक्के सीमा शुल्क भरावे लागते. मात्र, नागपुरातील व्यापारी काही कस्टम अधिकाऱ्यांना हाताशी धरून इंडोनेशिया आणि नायजेरियातून सुपारीची अवैध तस्करी करतात. यामुळे सरकारला दरवर्षी १५ हजार कोटींचा फटका बसतो. या प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी हा विषय ‘लोकसत्ता’ने सातत्याने लावून धरला होता. त्या वृत्ताची दखल घेऊन अन्न व नागरी पुरवठा विभाग व डीआरआयने कारवाई केली. याच काळात सामाजिक कार्यकर्ते मेहबूब चिमथानवाला यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करून सुपारीची तस्करी रोखावी, अशी विनंती केली. या प्रकरणात डीआरआयने प्रतिज्ञापत्र दाखल करून इंडोनेशियातून श्रीलंकामार्गे भारतात सुपारीची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच महसूल गुप्तचर संचालनालयातर्फे (डीआरआय) तपास सुरू असून आतापर्यंत ४ प्रकरणात गुन्हे दाखल होऊन आरोपींना अटक झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर न्यायालयाने सुपारीचे नमुने तपासण्याचा आदेश एफएसएसएआयला दिला. त्यानंतर एफएसएसएआयने मुंबई, नागपूर, भंडारा व गोंदिया येथील वेगवेगळया सुपारीचे ३० नमुने घेतले व सर्वच नमुने खाण्याकरिता अयोग्य असल्याची माहिती दिली.

बुधवारी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.  हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावरचे असून तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तसेच आरोग्यास अपायकारक असलेली सुपारी देशात दाखल होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशही सरकारला दिले. न्यायालयीन मित्र म्हणून अ‍ॅड. आनंद परचुरे, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. सौरभ चौधरी आणि अन्न सुरक्षा विभागातर्फे अ‍ॅड. रोहन मालविया यांनी बाजू मांडली.

शांतीनगर सडक्या सुपारीचे केंद्र

नागपुरात सडक्या सुपारीचा व्यापार मोठय़ा प्रमाणात चालतो. यातील बहुतांश सडक्या सुपारीचे विक्रेते शांतीनगर परिसरात आहेत. येथे ५०० सुपारी व्यापारी असून त्यापैकी २०० च्या वर सडक्या सुपारीच्या व्यवसायात आहेत. येथेच सुपारी गोदाम व सुपारी कापण्याचे कारखानेही आहे. सडक्या सुपारीची दररोज कोटय़वधींची उलाढाल होत असून त्याला पोलिसांचे ‘अर्थपूर्ण संरक्षण’ आहे. ‘लोकसत्ता’ने सातत्याने हा विषय उपस्थित केल्याने सुपारी व्यापारी असोसिएशनने अध्यक्ष बदलला असून आता आशिफ कलीवाला हे अध्यक्ष आहेत. त्यांचेही गोदाम या परिसरात आहे.