देशाचा निकाल ९९.०४ टक्के

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला असून राज्याचा निकाल ९९.९२ टक्के आहे. या मंडळाचे राज्यातील ८२ हजार ५०४ विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. देशाचा निकाल ९९.०४ टक्के लागला.

सीबीएसईची परीक्षाही यंदा रद्द करण्यात आली. अंतर्गत मूल्यमापनानुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील ८२ हजार ५६९ विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाने जाहीर केला असून त्यातील ८२ हजार ५०४ म्हणजेच ९९.९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

राष्ट्रीय पातळीवरील निकाल ९९.०४ टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेरपरीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ६३६ आहे.

देशभरातील १६ विभागीय मंडळांमार्फत झालेल्या या परीक्षेसाठी २१ लाख ५० हजार६०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २० लाख ९७ हजार १२८ विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाने जाहीर केला. १६ हजार ६३९ विद्यार्थ्यांचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. साधारण १ हजार ६० शाळांच्या निकालाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.

५० हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण

देशातील एकूण २ लाख ५८ हजार ७८६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यातील जवळपास ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण आहेत.

फेरपरीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा द्यायाची असल्यास संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या दरम्यान होणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या निकालाबाबत विद्यार्थी समाधानी नसल्यास त्यांनाही ही परीक्षा देता येईल.