मुंबई : जागतिकीकरणाच्या युगात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी, शिष्यवृत्ती आणि उदयोन्मुख करिअरबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना करिअर ठरविण्यास मदत होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) करियरचे पर्याय, तसेच त्यासाठीच्या विविध प्रवेश परीक्षांच्या माहितीबाबतचे प्रशिक्षण शाळांचे मुख्याध्यापक व समुपदेशकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी करिअर जागरूकता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमातून मुख्याध्यापक आणि समुपदेशक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तीची माहिती देऊ शकतात.
दहावीनंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा याबाबत संभ्रम असतो. त्यामुळे मित्र किंवा कुटंबातील एखाद्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेतात. मात्र अनेक वेळा निर्णय चुकल्याचे त्यांना कळते. परंतु हेच मार्गदर्शन जर त्यांना शाळेतच मिळाले तर त्यांचा निर्णय चुकणार नाही. ही बाब लक्षात घेऊन सीबीएसई मंडळाने विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन करण्यासाठी ‘करियर जागरूकता कार्यक्रम’ हाती घेतला आहे.
या कार्यक्रमांतर्गत शाळेचे मुख्याध्यापक व समुपदेशक असलेल्या शिक्षकांना करियरबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आवडी आणि क्षमता ओळखून त्यांना योग्य करियर पर्यायांचा शोध घेण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये मुख्याध्यापक व समुपदेशकांना देण्यात येणार आहे. यामुळे मुख्याध्यापक व समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी, शिष्यवृत्ती आणि उदयोन्मुख करिअर मार्गांबद्दल सहज माहिती उपलब्ध होण्यास मदत होऊन त्यांना आपले करियर सजगपणे निवडणे शक्य होणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी शाळांमध्ये मजबूत समुपदेशन प्रणालींवर भर देण्यात आला आहे. समुपदेशकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करियरबाबत मार्गदर्शन करणे सोपे होणार आहे. मुख्याध्यापक व समुपदेशकांना मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम बनविण्यासाठी सीबीएसईने वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार भारतातील विविध प्रदेशांमध्ये करिअर जागरूकता कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला १२ जूनपासून आसाममधील रॉयल ग्लोबल स्कूल येथून सुरुवात होणार आहे.
सीबीएसईने या कार्यक्रमासंदर्भात त्यांच्याशी संलग्न सर्व शाळांना एक लिंक पाठवली आहे. याद्वारे त्यांना नोंदणी करता येईल. मुख्याध्यापक आणि समुपदेशक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तीची माहिती चांगल्या प्रकारे देऊ शकतात. त्यामुळेच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.