बारा ज्योतिर्लिगांपकी आठवे ज्योतिर्लिग म्हणून सर्वदूर प्रसिद्ध म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होते. पहिल्या सोमवारी भाविकांनी नागनाथाचे मोठय़ा संख्येने दर्शन घेतले. पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला असून, भाविकांवर सीसीटीव्हीचे कॅमेरे नजर ठेवून आहेत.
औंढय़ात नागनाथाचे पांडवकालीन हेमाडपंती मंदिर डोंगरदऱ्यात वसले आहे. परिसरात मोठय़ा प्रमाणात असलेल्या जलसाठय़ामध्ये ज्योतिर्लिग औंढा नागनाथास कपिलगाय नित्य-दुग्धाभिषेक करीत होती, अशी आख्यायिका आहे. हे मंदिर पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांच्या काळात बांधल्याचे सांगण्यात येते. आमर्दक महात्मे या धार्मिक ग्रंथात नागनाथ ज्योतिर्लिगाचे महत्त्व विशद केल्याची नोंद आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव कार्यक्रम घेतला जातो. श्रावण महिन्यात देशभरातून नागनाथाच्या दर्शनास लाखोंच्या संख्येने भाविक औंढय़ात येतात.
रविवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता औंढा नागनाथ संस्थानचे अध्यक्ष, तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी सपत्नीक नागनाथाची महापूजा केली. िहगोलीचे खासदार राजीव सातव यांनीही सपत्नीक अभिषेक करून महापूजा केली. संस्थानचे सचिव माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, पोलीस उपअधीक्षक नीलेश मोरे, डॉ. विजय नीलावार, संस्थानचे मुख्य पुजारी, निळकंठ देव आदींची उपस्थिती होती. रात्री दोननंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दरम्यान, भिज पाऊस चालू असताना दर्शनासाठी भाविकांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या.
भाविकांवर सीसीटीव्हीची नजर
नागनाथाच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात भाविक येतात. मंदिर परिसरात सुरक्षिततेचा उपाय म्हणून सीसीडी बसविण्यात आल्या आहेत. मंदिरात व भोवती १६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, उपअधीक्षक नीलेश मोरे जातीने परिसरावर लक्ष ठेवून आहेत. याबरोबरच मंदिर परिसरात सुरक्षेसाठी तीन दिशेला पोलीस मनोरे उभारले आहेत. २७ जुलै ते २५ ऑगस्टपर्यंत येथील भाविकांची गर्दी, १ ऑगस्टला नागपंचमी, १० ऑगस्टला रक्षाबंधन, पोळा अमावास्या यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता मंदिरात विशेष खबरदारी घेतली जात आहे. २७ पोलीस अधिकारी, १३८ कर्मचारी, ६० होमगार्ड व मंदिर संस्थानचे ३० सुरक्षा रक्षक तनात केले आहेत. प्रथमोपचारासाठी मंदिरात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची एक महिन्यासाठी नियुक्ती केल्याचे संस्थानचे सचिव दिलीप चव्हाण यांनी सांगितले.
हिंगोली शहरातील सर्वदूर प्रसिद्ध जलेश्वर मंदिर, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील श्री जटाशंकर देवस्थान, पोतरा येथील पवित्रेश्वर महादेव मंदिर, सेनगाव तालुक्यातील गोंडाळा, केलसुला येथील पुरातन मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. औंढा येथील नागनाथ मंदिरात पहिल्या सोमवारी दिवसभर भाविकांची गर्दी लक्ष वेधून घेत होती. संस्थानने दर्शनासाठी विशेष पासची सोय केली आहे. औंढा नागनाथ मंदिरात पोलिसांच्या दिमतीला काही स्वयंसेवकही कार्यरत आहेत.