रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाआंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनवर आता सिसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. त्यामुळे अलिबाग मधील पोलीस अधिक्षक कार्यालयातून सर्व पोलीस स्टेशन घडामोडींवर बारीक लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे. पोलीस दलातील कामचुकारपणाला आळा बसावा आणि पोलीस स्टेशनच्या सुरक्षेत भर पडावी या दुहेरी हेतुने हा राज्यात प्रथमच हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे.
 म्हसळा, श्रीवर्धन आणि पोलादपुर सारख्या दुर्गम भागातील पोलीस स्टेशनमधे सध्या काय चालले आहे हे पोलीस अधिक्षकांना आपल्या केबिन मधे बसून समजू शकणार आहे. पोलीस स्टेशन मधे येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराला पोलीस कर्मचाऱ्यांकडून कशी वागणूक दिली जाते आहे. अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात उपस्थीत आहे का. तसेच पोलीस स्टेशनच्या बाहेरील परीसरात कुठल्या घडामोडी सुरु आहे हे देखील पोलीस अधिक्षक तसेच जिल्हा कंट्रोल रुमला समजू शकणार आहे. पोलीस दलातील कामकाजात पारदर्शकता यावी म्हणुन अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे.
रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कार्यलयिन कक्षेत पनवेल उरण तालुके वगळता एकुण २६ पोलीस स्टेशन्स आहेत. या सर्व पोलीस स्टेशन्समधे ६५ सिसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यात स्टेशन हॉऊस आणि पोलीस स्टेशन बाहेरील परीसराचा समावेष आहे. हे सर्व कॅमेरे पोलीस अधिक्षक कार्यालयातील सव्‍‌र्हरशी जोडण्यात आले असून, यासाठी जवळपास दिड लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच वेळी २६ पोलीस स्टेशन्स मधील घडामोडीवर प्रत्यक्ष नजर ठेवणे शक्य होणार असल्याचे रायगडचे पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे यांनी सांगीतले.
पोलीस स्टेशनमधे तक्रारी घेतल्या जात नाही अशा तक्रारी येत असत, एखादी तक्रार नोंदवण्यासाठी अनेकदा तक्रारदारांना तासनतास बसवून ठेवले जात असे, या सारख्या अप्रवृत्तीनां आळा घालण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केल आहे. पोलीस स्टेशन बाहेर अनेकदा येणाऱ्या लोकांकडून गोंधळ घातला जातो. त्यालाही या कॅमेऱ्यामुळे आळा बसू शकणार आहे.   राज्यात प्रथमच असा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. रायगड पोलीसांचा हा पॅटर्न राज्यातील इतर जिल्ह्य़ांनी घेतला तर पोलीस दलातील कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊ शकेल.