रत्नागिरी :  जनगणना २०२७ मोहिमेअंतर्गत स्वगणना प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण करणारे चिपळूण तालुक्यातील दळवटणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. जिल्हा प्रशासनाने या कामगिरीचे कौतुक करत आगामी जनगणनेसाठी दळवटणे गाव आदर्श ठरत असल्याचे म्हटले आहे.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरयादी आणि घरगणनेच्या पूर्वतयारीसाठी १ ते १५ मे २०२६ हा कालावधी स्वगणनेसाठी निश्चित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोहिमेचे नियोजन करण्यात आले. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी १ मे रोजी स्वगणना करून जिल्ह्यात मोहिमेचा प्रारंभ केला होता.

उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दळवटणे गावाची या विशेष उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. गावातील सर्व नऊ वाड्यांमधील ४२५ कुटुंबांची नोंदणी विहित मुदतीत पूर्ण करण्यात आली.

२०११ च्या जनगणनेनुसार दळवटणे गावाची लोकसंख्या १८७१ होती. नव्या स्वगणनेनुसार गावाची अंदाजे लोकसंख्या २२६२ इतकी झाली असून, एकूण कुटुंबसंख्या ४२५ असल्याची माहिती समोर आली आहे.

या मोहिमेसाठी तहसीलदार प्रवीण लोकरे, मंडळ अधिकारी नारायण चौधरी यांनी मार्गदर्शन केले. प्रगणक वैशाली पेड्डेवाड, सचिन जाधव आणि प्रिया मोरे यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय काम पाहिले. तसेच शीतल कराडकर, रोशनी जाधव, ऋतुजा इंगवले, मेघना नलावडे, सुप्रिया बोबले, अर्चना जाधव, सीमा गमरे, सुवर्णा जाधव आणि पोलीस पाटील अमित मोहिते यांनी मदतनीस म्हणून सहभाग नोंदवला.

शेट्येवाडी, गणेशवाडी, बागवाडी, रामवाडी, भुवडवाडी, नलावडेवाडी, बडदेवाडी, राजवाडा आणि बौद्धवाडी या सर्व वाड्यांमध्ये स्वगणना शंभर टक्के पूर्ण झाली आहे.