मुंबई : जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या नियोजनासाठी जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक नुकतीच झाली. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये याचे काम होणार असून, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा इतर  जातींची नोंद यावेळी होत आहे. जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये बदल करावा, या मागणीसाठी इतर मागासवर्गीय संघटनांच्या आंदोलनाला आता धार चढण्याची शक्यता आहे.

राज्यात जनगणना-२०२७ चा पहिला टप्पा म्हणजे घरगणना मे-जून २०२६ दरम्यान पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण, प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचे नियोजन करण्यात येत आहे. हे सर्व उपक्रम मार्च २०२७ पर्यंत राज्यभर राबविण्यात येणार आहेत. सर्व विभागांनी आपापल्या कार्ययोजना जनगणनेच्या वेळापत्रकाशी सुसंगत ठेवून कामाचा वेग कायम राखावा, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश आग्रवाल यांनी दिले आहेत.

दुसऱ्या टप्प्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी गृह रक्षक दल, वन विभाग, जिल्हा परिषद आणि शिक्षकांसह अन्य पात्र कर्मचाऱ्यांची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित जिल्हास्तरीय कार्यालयांनी नियुक्तीसाठी पात्र अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची यादी तयार करून संबंधित जनगणना अधिकाऱ्यांकडे (तहसीलदार/ मुख्याधिकारी/ प्रभाग अधिकारी) द्यावी, अशा सूचना मुख्य सचिवांनी दिल्या आहेत.

२०११ च्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात २९ प्रश्न होते. यावेळी ४० प्रश्न आहेत. राज्य शासनाने ३ सप्टेंबर रोजी प्रश्नावली अधिसूचित केली आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या सर्व जनगणनेत अनुसूचित जाती आणि जमातींची गणना होत आली आहे.  यावेळी पहिल्यांदा सर्व जातींची गणना होत आहे.  इतर मागासवर्गीय संघटनांनी (ओबीसी) जातीय जनगणणेची केंद्राकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. त्यामुळे गृह विभागाने यावेळच्या प्रश्नावलीमध्ये १० व्या क्रमांकावर अनुसूचित जाती, जमाती बरोबर ‘जाती’ असा शब्द समाविष्ट केला आहे.

दुसऱ्या टप्प्याची प्रश्नावली जाहीर झाल्यानंतर ‘ओबीसी’ संघटना आक्रमक झाल्या आहेत. अनुसूचित जाती, जमाती यांच्याप्रमाणे ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना हवा, अशी त्यांची मागणी आहे. केवळ ‘जाती’ शब्द लिहिल्याने इतर जातींची नोंद होण्याची त्यांना भीती आहे. त्यामुळे संभ्रम वाढणार असून ओबीसींचे प्रमाण स्पष्ट होणार नाही, असा संघटनांचा आरोप आहे. प्रश्नावलीत बदला करण्याची ओबीसी संघटनांची मागणी कायम असून दुसरा टप्पा जवळ आल्याने या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.

संभ्रम वाढणार

ओबीसी प्रवर्गात राज्यात ३५० जाती आहेत. एससी-एसटींची नोंद करताना प्रश्नावलीमध्ये त्या प्रवर्गातील सर्व जाती तिथे नमूद असतात. नागरिकांनी त्यातील आपली जात सांगायची असते. त्यामुळे नेमकी जात नोंदली जाते. तसा रकाना ओबीसींसाठी दिलेला नाही. त्यामुळे आडनावे, पोटजाती, स्थानिक जातींची नावेसुद्धा यावेळी नोंद होतील. परिणामी, ओबीसींची लोकसंख्या स्पष्ट होणार नसल्याने या प्रश्नावलीला आमचा विरोध आहे. – शंकरराव लिंगे, अखिल भारतीय माळी महासंघ, नाशिक