अलिबाग – जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांच्या बदल्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतल्याने कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनगणनेच्या कामात गुंतलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसह गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील कर्मचार्‍यांची यावर्षी सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबवू नये, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. शासनाच्‍या या निर्णयामुळे बदलीपात्र कर्मचार्‍यांमधे‍ये समाधानाचे वातावरण आहे.

ग्रामविकास विभागाच्या उपसचिव वैशाली डिगे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना यासंदर्भात पत्र पाठवून स्पष्ट निर्देश दिले आहेत. जनगणनेचे काम अत्यंत महत्त्वाचे असून त्यात कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, जनगणनेशी संबंधित माहिती संकलनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पंचायत समिती निहाय जनगणना कामात नेमके कोणते कर्मचारी व शिक्षक कार्यरत आहेत, याची अधिकृत माहिती अद्याप जिल्हा परिषद मुख्यालयाकडे प्राप्त झालेली नाही. ही माहिती प्राप्त झाल्यानंतरच नेमक्या किती कर्मचार्‍यांच्या बदल्या स्थगित राहणार आणि किती जणांची बदली होणार, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

दरवर्षी १० वर्षे सेवा पूर्ण केलेले किंवा एकाच ठिकाणी सलग ५ वर्षे सेवा केलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या ३१ मेपूर्वी केल्या जातात. मात्र यंदा जनगणनेच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेत बदल करण्यात आला असून, केवळ जनगणना कामात नियुक्त नसलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या ३१ मे २०२६ पूर्वी पूर्ण केल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या निर्णयामुळे जनगणनेच्या कामात सहभागी असलेल्या हजारो कर्मचार्‍यांना यावर्षी सध्याच्या ठिकाणीच सेवा बजावावी लागणार आहे. त्यामुळे वारंवार बदल्यांच्या ताणातून काही प्रमाणात दिलासा मिळाल्याची भावना कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.

मात्र, ज्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कारणास्तव किंवा कौटुंबिक गरजांमुळे विनंती बदली अपेक्षित होती, त्यांच्यासाठी ही स्थगिती अडचणीची ठरू शकते. विनंती बदल्यांबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नसल्याने संबंधित कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जनगणनेच्या कामाला प्राधान्य देत शासनाने घेतलेला हा निर्णय प्रशासनिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असला, तरी विनंती बदल्यांबाबत लवकरच स्पष्टता देण्याची अपेक्षा कर्मचारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

दरम्‍यान जनगणेनसाठी किती कर्मचार्‍यांची गरज आहे हे प्रशासनाने निश्चित केले असले तरी आपल्या विभागाकडून किती कर्मचारी या कामासाठी लागणार आहेत याची माहिती संकलित केली जात असून प्रत्येक विभागाकडून जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे.