आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी जिल्ह्य़ातच केंद्र ; गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संचालकांचे स्पष्टीकरण

गट क संवर्गातील पदभरतीसाठी २४ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवाराने अर्ज केलेले पद ज्या नियुक्ती अधिकाऱ्याअंतर्गत येते त्याच विभागातील जिल्ह्य़ात परीक्षा केंद्र दिले गेले आहे, असे स्पष्टीकरण आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी रविवारी केले.

पुढील आठवडय़ात होणाऱ्या परीक्षांच्या नियोजनात पुन्हा एकदा गोंधळ झाला असून, उमेदवारांच्या परीक्षा केंद्रांवरून तक्रारी सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य संचालकांनी स्पष्टीकरण के ले आहे.

गट क संवर्गातील पदभरतीसाठी २४ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी एक संवर्ग राज्य आणि मुंबई स्तरावरील, २३ संवर्ग राज्य आणि पुणे स्तरावरील आहेत, तर आठ मंडळ स्तरावर २८ संवर्ग आहेत. राज्य स्तरावरील नियुक्ती अधिकारी संबंधित सहसंचालक तर मंडळ स्तरावर संबंधित उपसंचालक नियुक्ती अधिकारी आहेत. ‘न्यासा कम्युनिकेशन’ कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. ‘गट क’मधील ५२ संवर्गातील २७३९ पदांसाठी ४,०५,१६३ अर्ज आले आहेत. परीक्षेसाठी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही शनिवारपासून सुरू झाली आहे व रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २,०७,१३७ प्रवेशपत्रे डाऊनलोड केली आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

उमेदवार एका किंवा अनेक पदांसाठी अनेक विभागांत अर्ज करतात. त्या पदांसाठी शैक्षणिक पात्रतेचा विचार करीत नाहीत.

अनेक ठिकाणी अर्ज करणारे उमेदवार नक्की कोणत्या ठिकाणी परीक्षा द्यायची आहे, हे निश्चित करीत नाहीत. त्यांना सर्वच परीक्षा केंद्रे जवळची हवी असतात. या वेळी ५२ संवर्गातील पदासाठी परीक्षा दोन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) मध्ये घेण्यात येतील. एका पाळीत दहावी ते बारावी शैक्षणिक पात्रता आवश्यक असणाऱ्या पदांसाठी, तर दुसऱ्या पाळीत पदवी आणि त्यावरील शैक्षणिक पात्रता आवश्यक असणाऱ्या पदांचा समावेश केला आहे, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. 

परीक्षा केंद्र देताना उमेदवारांच्या प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार केला आहे. उमेदवारांनी एका मंडळात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असल्यास त्यासाठी एकाच शहरात दोन पाळ्यांमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.

पुणे, नाशिक, अकोला मंडळात जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे त्या मंडळातील उमेदवारांना नजीकच्या जिल्ह्य़ातील परीक्षा केंद्रे दिली आहेत. दिव्यांग उमेदवारांना शक्यतो जवळचे केंद्र दिले आहे. मात्र वेगवेगळ्या नेमणूक अधिकाऱ्यांतर्गत अर्ज केला असल्यास त्या अधिकारी कार्यक्षेत्रात केंद्र देण्यात आले आहे. प्रवेशपत्रावर छायाचित्र आणि सही अस्पष्ट असल्यास उमेदवारांनी न्यासा कम्युनिकेशन कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य संचालकांनी केले.

नियोजन असे..

’५२ संवर्गातील पदासाठी परीक्षा दोन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) घेण्याचे निश्चित.

’एका पाळीत दहावी ते बारावी पात्रता आवश्यक असणाऱ्या पदांसाठी परीक्षा.

’दुसऱ्या पाळीत पदवी आणि त्यावरील पात्रता आवश्यक असणाऱ्या पदांचा समावेश. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Center in the district for health department examinations zws

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या