केंद्रीय समितीचा दापोलीला पुन्हा दौरा

चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी

संग्रहित छायाचित्र

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी नियोजनानुसार आपला  दौरा पूर्ण केला नव्हता. याबाबत दापोलीतील नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केल्यामुळे या पथकाला पुन्हा दापोलीचा दौरा करावा लागला.

ही केंद्रीय समिती १७ जूनला मंडणगड आणि दापोलीच्या दौऱ्यावर आली होती. यावेळी त्यांनी मंडणगड व केळशीतील नुकसानीची पाहणी केली. मात्र नियोजनानुसार आंजर्ले, पाजपंढरी, हर्णै, कर्दे आणि मुरुड या गावांची भेट मात्र रद्द केली. त्यामुळे या समितीसंदर्भात दापोलीवासियांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या संदर्भात काही  नागरिकांनी या समितीची  तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या सूचनेनुसार या पथकाने शुक्रवारी पुन्हा दौऱ्याचे नियोजन केले.

यानिमित्ताने  भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या समितीला निवेदन दिले. या निवेदनात दापोली तालुक्यातील बागायती, पर्यटन, मत्स्यउद्य्ोग, शेतीचे नुकसान भरून काढण्यासाठी तसेच हे व्यवसाय पुन्हा सुरू होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा समावेश होता. या वेळी डॉ. सुभाष चव्हाण व दीपक विचारे (दापोली), अशोक परांजपे (मुर्डी), प्रशांत परांजपे, सौरभ बोडस (जालगाव), केदार साठे, विनय जोशी यांनी केंद्रीय समितीशी चर्चा केली.  या वेळी केंद्रीय समितीचे प्रमुख रमेश कुमार गणता, सदस्य आर. बी. कौल, एन. आर. एल. के. प्रसाद, एस. एस. मोदी, आर. पी. सिंग, अंशुमली श्रीवास्तव आदी उपस्थित होते. राज्य शासनाचे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार तसेच अन्य अधिकारीही उपस्थित होते. शुक्रवारी नव्याने केलेल्या दौऱ्यात या पथकाने आंजर्ले, हर्णे, मुरुड व कर्दे या गावांना भेट देऊन वादळामुळे झालेल्या हानीची पहाणी केली. पथकाचे प्रमुख रमेश कुमार गणता यांनी आपण सकारात्मक अहवाल सादर करून अधिकाधिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Central committee visits dapoli again abn

ताज्या बातम्या