शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात केंद्रातील भाजपाला लक्ष केलं. बिल्किस बानो आणि अंकिता भंडारी प्रकरणांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पलटवार करत शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. यावेळी नारायण राणेंनी दिशा सालियान खून प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियानचा खून झाला. तिच्यावर अत्याचार करून खून झाला. का त्या प्रकरणातील आरोपींना अटक झाली नाही. कोण मंत्री होता? का वाचवण्यात आलं? सचिन वाझेंना पोलीस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवलं,” असे नारायण राणेंनी म्हटलं.

हेही वाचा – दसरा मेळाव्यावर पहिली प्रतिक्रिया देताना नारायण राणे संतापून म्हणाले, “राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर उद्धव ठाकरे…”

“सत्ता तुमची नाही आहे…”

“लोक चर्चा करतात आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणात होते. सचिन वाझेंनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. अशी पाप करायला मुख्यमंत्री झाला होता का?, आता उत्तराखंड केसबद्दल बोलता. चुकीच झालं असेल कारवाई होईल, आम्ही लपवणार नाही. मात्र, दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूतबाबत केल्यालं पाप विसरता येणार नाही. आता तुमची सत्ता नाही आहे, त्यामुळे त्यातील आरोपी पकडले जाणार,” असा इशाराही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.