काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही कायद्यानुसार आहे. यामध्ये भाजपाचा काहीही संबंध नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. गांधींनी अनेकवेळा चुकीची वक्तव्ये केली आहेत. एकवेळ त्यांना माफीही मागावी लागली. त्यामुळे राहुल गांधींनी बोलताना तारतम्य बाळगण्याची गरज आहे, असा सल्ला आठवलेंनी दिला आहे. रामदास आठवले म्हणाले, "नागालँडमध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर आहे. त्याच पध्दतीने शरद पवार यांनी एनडीएबरोबर यावं. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. तसेच, मोदींनी अनेकवेळा पवारांचं कौतुकही केलं आहे. त्यामुळे त्यांनी कितीही विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, तरी 2024 मध्ये पुन्हा एनडीएचीच सत्ता येणार आहे." हेही वाचा : “…अन् लोक एवढी मुर्ख राहिली आहेत का?” उद्धव ठाकरेंच्या सभेवरून बच्चू कडूंचं टीकास्र "लोकांना भावनिक पातळीवर आवाहन करण्याऐवजी." "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचा गर्दी जमवण्यात हातखंडा आहे. तरी, भोंग्याचा मुद्दा वाढवू नये. भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील, याचा त्यांनी विचार करावा. लोकांना भावनिक पातळीवर आवाहन करण्याऐवजी त्यांनी विकास कामांना महत्व देउन आपला पक्ष वाढवावा," असे रामदास आठवले यांनी म्हटलं. "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर." "राज्यातल्या शिवसेनेच्या आणि सत्ता संघर्षाच्या बाबतीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूनेच निकाल लागेल. शिवसेना पक्ष आणि चिन्ह घालवण्यास उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जबाबदार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ही वेळ आली नसती," असेही रामदास आठवले म्हणाले. हेही वाचा : “मालेगावच्या सभेत जास्तच खोटं बोलले, तर…”, दादा भुसेंचा ठाकरे गटाला इशारा "शिर्डी लोकसभा मतदार संघामधून." "लोकसभा निवडणुकीत राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाला दोन जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. यापैकी शिर्डी लोकसभा मतदार संघामधून स्वत: मैदानात उतरण्याची तयारी आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार," असेही रामदास आठवलेंनी सांगितलं.