scorecardresearch

अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपला दुसऱ्यांचा पक्ष..”

Raosaheb Danve : अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपला दुसऱ्यांचा पक्ष..”
रावसाहेब दानवे

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेसोबत बंडखोरी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देखील पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“भाजपाला दुसरा पक्ष फोडण्यात रस नाही. कोणाचा पक्षही भाजप फोडत नाही. मात्र, कोणाच्या पक्षात फूट पडत असेल आणि ते आम्हाला मदत करत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहोत. आम्हाला गरज पडेल उपयोग होईल, तेव्हा जेवढे काही असंतुष्ट गट असतील, त्यांचा भाजपासाठी उपयोग करुन घेऊ. आता आम्हाला कोणाचाही गरज नाही आहे. आमच्या विचारांशी असंतुष्ट सहमत असतील, तर त्यांना सोबत घेऊ,” असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“माझी त्यांच्याशी कोणतीही…”

सध्या राज्यात सुरु असलेल्या तर्कवितर्कांच्या चर्चेंवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अशोक चव्हाण यांनी माझी कुठलीही भेट घेतलेली नाही. एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी मी पोहचलो आणि तेही पोहचले. ते दर्शन घेऊन निघाले तेवढ्यात मी पोहचलो. असं तर सगळ्यांचं होतं. मात्र, माझी आणि त्यांची कुठलीही भेट झालेली नाही,” असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे.

“…तर विचार करू”

“अशोक चव्हाण यांचा प्रस्ताव आला तर विचार करु. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. भाजपा पक्ष श्रेष्ठीच त्यासंदर्भातील निर्णय घेतील. काँग्रेस पक्षाला काय भविष्य राहिलं आहे. त्यामुळे कार्यकर्ते आता आपला विचार करत आहेत. अशोक चव्हाण आणि माझी याबाबत चर्चा झाली नाही,” असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

“ते वृत्त खोडसाळपणाचे”

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा फेटाळल्या आहेत. ट्विट करत त्यांनी याप्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारं आहे. अशोक चव्हाण हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबाबात जबाबदारीने वृत्तांकन करण अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे, माध्यमांनी हे थांबवावं,” अशी विनंती बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या