मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज सलग चौथ्या दिवशी पावसाच्या सरींचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. नेरळ-भिवपुरी रेल्वे स्थानकांवर पाणी साठलं आहे त्यामुळे बदलापूर ते कर्जतची लोकल सेवा ठप्प झाली आहे. बदलापूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकलही उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऑफिस गाठणाऱ्यांचा लेट मार्क आजही पक्का आहे. मध्य रेल्वेने ही माहिती दिली आहे की नेरळ-भिवपुरी स्थानकांवर पाणी साठलं आहे त्यामुळे ही सेवा विस्कळीत झाली आहे.
नेमकं काय घडलंय मध्य रेल्वे मार्गावर?
- मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
- नेरळ-भिवपुरी स्थानकांदरम्यान रुळांवर साठलं पाणी
- बदलापूर-कर्ज लोकल सेवा विस्कळीत
- सलग चौथ्या दिवशी पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा उशिराने
- मुंबईत जाऊन ऑफिस गाठणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय
नेमकं काय घडलंय? प्रवाशांचे हाल का होत आहेत?
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार कर्जतकडून मुंबईच्या दिशेने कुठलीही लोकल जात नाहीये तर मुंबईकडून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन्स या बदलापूरपर्यंत आणि नेरळपर्यंत चालवल्या जात आहेत. या स्थानकांवरुनच लोकल पुन्हा मुंबईच्या दिशेने चालवल्या जात आहेत. तसंच ही सेवाही उशिराने सुरु आहे. कर्जतहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. सलग चौथ्या दिवशी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. नेरळहून पहाटे ५ वाजून ४० मिनिटांची एकच लोकल मुंबईच्या दिशेने आली आहे. लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने काही धिम्या गतीच्या लोकल जलद गतीने चालवण्यात येत आहेत. ज्याचा परिणाम मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवेवर झाला आहे. अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. बदलापूर ते कर्जत ही लोकल सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत विस्कळीत आहे. लोकल सेवा पूर्वपदावर कधी येणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मुंबईतल्या तिन्ही मार्गांवरची लोकल सेवा उशिराने
मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि वेस्टर्न अशा तिन्ही मार्गांवरची लोकल सेवा उशिराने सुरु आहे. मध्य रेल्वे मार्गावर लोकलची वाहतूक १५ मिनिटं उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक ही २० मिनिटे उशिराने सुरु आहे. तर हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. वसई आणि नालासोपारा या रेल्वे स्थानकांवर पाणी साठल्याचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. पावसामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडून पडलं आहे. तिन्ही मार्गांवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
