करोना मृत्यूदरावर लक्ष देण्याची केंद्रिय पथकाची सूचना

करोना प्रतिबंधासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवकांचे सहकार्य

प्रतिकात्मक छायाचित्र

करोना संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंधांची कडक अमलबजावणी करावी, अशी सूचना केंद्रिय पथकाचे प्रमुख तथा वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. ए. जी. अलोने यांनी केली. करोना प्रतिबंधासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवकांचे सहकार्य घेण्यासही त्यांनी सांगितले.

शहर आणि जिल्ह्यातील करोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत केंद्रिय पथकाने आढावा बैठक घेतली. या बैठकीत अलोने यांनी मार्गदर्शन केले. झोपडपट्टीचा भाग तसेच जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी होणे आवश्यक असल्याचेही डॉ. अलोने यांनी नमूद केले. उच्च रक्तदाबाचे रूग्ण, मधुमेही यांचा औषधोपचार व्यवस्थित सुरू असल्यासंदर्भात कायम आढावा घेण्यात यावा, त्यासाठी त्याच परिसरातील वॉर्डनिहाय स्वयंसेवकांची  नेमणूक करावी, संस्थात्मक विलगीकरण वाढविण्यासह अधिक चाचण्या करण्यावर भर द्यावा, चाचण्यांचे अहवाल २४ तासात प्राप्त होतील अशा उपाययोजना कराव्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या. शहरात कोणत्या रूग्णालयात खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती तयार ठेवावी, खाटा व्यवस्थापन यंत्रणा तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापन यंत्रणा गतिमान करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील रुग्णसंख्या, परिसरनिहाय रुग्ण, रुग्णांमध्ये असलेले विविध आजार, रुग्णांचे वर्गीकरण, करोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण आणि त्याची कारणे, प्रतिबंधित क्षेत्राचा तपशील, घरोघरी झालेले सव्‍‌र्हेक्षण, कोविड केंद्र, शासकीय तसेच खासगी रुग्णालयांची स्थिती आदींचा आढावा यावेळी पथकाने घेतला.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी आतापर्यंत तपासणी करण्यात आलेले नागरिक, बाधित रुग्ण, मृत्यू झालेल्या रूग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी, बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या, प्रतिबंधित क्षेत्र आणि त्यातील उपाययोजना, तसेच शासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली.

बैठकीस खासदार रक्षा खडसे, डॉ. एस. डी. खापर्डे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील आदी अधिकारीही उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Central team instructed to look into corona mortality abn

ताज्या बातम्या