scorecardresearch

केंद्राने तीन कृषी कायदे मागे घेणे शेतकऱ्यांच्या प्रगतीआड; मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्ष शेषराव मोहिते यांचे मत

केंद्राचे तीन कृषी कायदे मागे घेणे शेतकऱ्यांच्या दृष्टिने अन्यायकारक आहे हे सांगताना शेषराव मोहिते म्हणाले, दीड-दोन वर्षांपूर्वी केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे शेती व्यवसायाच्या दृष्टचक्रातून शेतकऱ्यांची सुटका होण्याचे दार थोडे किलकिले झाले होते.

lekh1 farmer

लक्ष्मण राऊत

जालना : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषीविषयक कायद्यानी शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण तयार झालेला असताना हे कायदे मागे घेतल्यामुळे  शेतकरी आणखी किमान वीस वर्षे तरी वर येऊ शकणार नाही, असे मत प्रसिद्ध साहित्यिक शेषराव मोहिते यांनी शनिवारी घनसावंगी येथे ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.

केंद्राचे तीन कृषी कायदे मागे घेणे शेतकऱ्यांच्या दृष्टिने अन्यायकारक आहे हे सांगताना शेषराव मोहिते म्हणाले, दीड-दोन वर्षांपूर्वी केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे शेती व्यवसायाच्या दृष्टचक्रातून शेतकऱ्यांची सुटका होण्याचे दार थोडे किलकिले झाले होते. परंतु इतर काही हितसंबंध गुंतलेल्यांनी वर्षभर आंदोलन करून केंद्रास हे कायदे मागे घ्यावयास लावले. केंद्र सरकारही याबाबत कितपत शेतकऱ्यांच्या बाजूने होते हे देखील शेवटपर्यंत कळले नाही. या एका निर्णयाने भारतीय शेतकरी आणखी किमान वीस वर्षे तरी वर येऊ शकणार नाही.

आपली कोरडवाहू शेती आतबट्टय़ाची असून त्यामध्ये गरिबीचे मूळ कारण आहे. आर्थिक उदारीकरणाच्या कालखंडात शेती आणि शेतकऱ्यांना बरे दिवस येतील, असे वाटले होते. परंतु आर्थिक उदारीकरण आणि खासगीकरणाचा लाभ जसा इतर क्षेत्रांना झाला तसा तो जाणीवपूर्वक शेती क्षेत्राला होऊ दिला नाही. शेतीचे विभाजन झाल्याने नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी अडीच एकरपेक्षा कमी जमिनीचे मालक झालेले आहेत. हे प्रगत किंवा निरोगी अर्थव्यवस्थेचे लक्षण नाही. येथील राज्य व्यवस्थेचा शेती क्षेत्रातील असभ्य आणि अनैतिक हस्तक्षेप यास कारणीभूत आहे. १९८० मध्ये बंगळुरू येथे आशिया खंडातील कृषी शास्त्रज्ञांच्या परिषदेत जागतिक हरित क्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनी इशारा दिला होता की, हरित क्रांतीमुळे अन्न धान्य उत्पादन वाढून दुष्काळ पडला तरी अन्नधान्य टंचाईमुळे लोक मृत्यूमुखी पडणार नाहीत. परंतु विकसनशील आणि अविकसित देशांतील राज्यकर्त्यांचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बदलला नाही तर त्यांचा शेती करण्याचा उत्साह नाहीसा होईल. भारतीय शेतकऱ्यांचा शेती करण्याचा उत्साह कमी झाला नाही. परंतु त्यांची जगण्याची उमेद मात्र संपली. त्यामुळे जनतेला अन्नधान्याची टंचाई भासत नसली तरी शेतकऱ्यांवर मात्र, जीव देण्याची वेळ आली. रशियन साम्यवादी क्रांतीची भुरळ आणि युरोपियन देश तसेच अमेरिकेतील औद्योगिक क्रांती या दोन्हींच्या आकर्षणातून स्वीकारलेली मिश्र अर्थव्यवस्था आणि तिला दिली गेलेली कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची जोड यामुळे शेतीचे अर्थकारण बिघडले.

लेखकांसमोर आव्हान

ग्रामीण भागातील प्रचंड दु:खाचे दर्शन घडविण्याचे आव्हान आपल्या आणि नंतरच्या पिढीतील लेखकांसमोर आहे. अनेक जण ते यशस्वीरीत्या  पेलवतही आहेत. साहित्यिकांविषयी आपुलकी नसलेल्या समाजात आपण राहत आहोत. आज महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या राज्यातही अनेक लेखकांना कधी नव्हे एवढे असुरक्षित वाटते आहे. कुणाच्या भावना तुमच्या लिखाणामुळे कधी दुखावल्या जातील, याचा नेम नाही. बिनडोक आणि अधमवृत्तीचे लोक नेहमी एकमेकांचा तिरस्कार करतात. तरी सुद्धा वेळ आली की तेच लोक एकमेकांना सांभाळून घेतात आणि हीच त्यांची शक्ती असते. नवा इतिहास घडविणाऱ्या कोसलाची जेवढी आणि जशी चर्चा झाली तेवढी धगची झाली नाही हे सांगतानाच आसाराम लोमटे, राजकुमार तांगडे आदींच्या कथा जागतिक अनुवादाच्या पातळीवरच्या आहेत, असे शेषराव मोहिते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-12-2022 at 00:02 IST