अकोला : वाशीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसूमना पंत यांनी ‘बालक दत्तक’ योजनेत पुढाकार घेऊन दोन कुपोषित बालिकांना दत्तक घेतले. पंत यांनी योजनेत पुढाकार घेऊन इतरांपुढे आदर्श ठेवला आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बालकांच्या कुपोषण वाढीवर नियंत्रण मिळवण्यासोबतच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तालुक्यातील सर्व अतितीव्र कुपोषित श्रेणीतील बालकांना तालुकास्तरावरील सर्व विभाग प्रमुख व विस्तार अधिकारी दर्जाच्या पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी दत्तक घेऊन त्यांचे श्रेणीवर्धन करणे व श्रेणीवर्धन झालेल्या बालकांच्या श्रेणीत घसरण होऊ नये, याकरिता ‘कुपोषित बाल दत्तक योजना’ राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी उमराळा व जांभरून (नावजी) या गावातील अंगणवाडय़ांना भेट दिली. उमराळा येथील दोन वर्षीय अतितीव्र कुपोषित बालिका श्रेया रामेश्वर कव्हर तसेच जांभरून (नावजी) येथील पाच वर्षीय बालिका पल्लवी गोपाल घुले या बालिकांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी दत्तक घेतले. या कव्हर या बालिकेच्या पालकांना समुपदेशन करून श्रेणीवर्धन करण्यासाठी सरकारी दवाखान्यातील ‘एनआरसी’मध्ये दाखल करण्यासाठी प्रवृत्त केले. श्रेया हिला साधारण श्रेणीमध्ये आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी पंत यांनी त्यांच्या पालकांना दिले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांच्या मार्गदर्शनात वाशीम ग्रामीण प्रकल्पातील उमराळा येथे पर्यवेक्षिका नूतन धोटे यांनी श्रेया या बालिकेस गृहभेट देऊन त्यांचे समुपदेशन केले. जांभरून नावजी येथील भेटीप्रसंगी पर्यवेक्षिका बी बी वानखेडे उपस्थित होत्या.