शिक्षण विभागातील बहुतांश अधिकारी आर्थिक मोहापायी व राजकीय दबावाखाली गुणवत्तेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र असताना आता गुणवत्तावाढीसाठी स्वत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी पुढाकार घेतला आहे. या साठी शनिवारी (दि. १३) बठकीचे आयोजन केले आहे. मात्र, प्रथमच अशी बठक होणार असल्याने धास्तावलेल्या काही विस्तार अधिकाऱ्यांसह अनेकांनी ‘रजेवर’ जाण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.
येथील जि. प. चा शिक्षण विभाग गरप्रकारासाठी सर्वदूर कुप्रसिद्ध आहे. गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने आपली कोणतीही जबाबदारी नाही, अशा आविर्भावात शिक्षण विभागातील अधिकारी असतात. केवळ पदाधिकाऱ्यांची मर्जी सांभाळणे, प्रशासकीय काम पूर्ण करणे, वरिष्ठांच्या बठकांना हजर राहणे अशी कामे जि. प. तील अधिकारी करतात. बहुतांश विस्तार अधिकारी केवळ शाळांना भेटी देऊन वेगवेगळी माहिती संकलित करणे, उणिवा असलेल्या शाळांना सुधारणा करण्याची संधी देण्याऐवजी किंवा सुधारण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याऐवजी आर्थिक मोहाला बळी पडत जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न करतात. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी नियमित भेटी देऊन गुणवत्तावाढीस प्रयत्न करणे अपेक्षित असते. परंतु मोजकेच वगळता बहुतांश अधिकारी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात.
जि. प. ने सीईओ काळे यांच्या पुढाकारातून ‘लक्षवेधी नमस्कार’ हा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी विनम्रता आत्मसात करावी, तसेच मोठय़ांबद्दल आदर निर्माण होताना त्यांना शाळेची गोडी लागावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. परंतु काही तालुक्यांत या उपक्रमाचा प्रसारच झाला नाही. अनेक उपक्रमशील विस्तार अधिकाऱ्यांनी केवळ आपल्या परिक्षेत्रातच नव्हे, तर जमेल तेथे उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. त्याचे परिणामही चांगले झाले. जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आता सीईओंनीच पुढाकार घेतला आहे. शनिवारी (दि. १३) त्यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांची बठक आयोजित केली आहे.
दरम्यान, अशी बैठक प्रथमच होत असल्याने गुणवत्तेचा गंध नसलेले अनेकजण रजेवर जाण्याच्या मानसिकतेत आहेत. जि. प.त एखादा विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखाने धाडसाने कारवाई केल्यास संबंधिताला वरिष्ठांचे पाठबळ मिळत नाही, असा अनुभव आहे. मात्र, त्यामुळेच अनेक शिक्षक मनमानी कारभारासाठी प्रसिद्ध आहेत. मी विस्तार अधिकाऱ्यांच्या जवळचा आहे, मी शिक्षणाधिकाऱ्यांशी संबंधित आहे, माझे गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत असे सांगत अनेक गुरुजी शैक्षणिक कामे सोडून अन्य कामात रुची दाखवतात, ही बाब सीईओंच्या निदर्शनास आली. त्यामुळेच गुणवत्तावाढीसाठी चळवळ उभी करण्याचा निर्धार त्यांनी केल्याचे सांगण्यात आले.