Sanjay Shirsat Statement: “गेल्या दोन दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता, राजकारणात माणसापेक्षा खुर्ची महत्त्वाची आहे असं दिसतंय. माणसापेक्षा खुर्ची जिंकली आहे. सार्वजनिक जीवनात खुर्ची जिंकली आणि माणूस हरला आहे. सर्वसामान्य लोकांना या गोष्टी भावत नाहीत. तीन दिवसांचा शासकीय दुखवटा सुरु असताना हे होतंय. थोडा कालावधी जायला हवा होता”, अशा शब्दात शिंदे सेनेचे नेते (राज्याचे सामाजिक न्याय मंत्री) संजय शिरसाट यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर नाराजी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज सायंकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याबाबत वेगाने घडामोडी घडत असताना संजय शिरसाट यांनी यासह विविध विषयांवर पत्रकार परिषदेत भाष्य केले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेत खंड पडेल

“अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो होते. त्यांच्या निर्णयाविरोधात जाण्याची त्यांना क्रॉस करण्याची ताकद कोणत्याही नेत्यात नव्हती. शरद पवार किंवा इतर नेत्यांशी अजित पवारांच्या झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला असता तर, तो सर्वांनी मान्यही केला असता. पण आता परिस्थिती बदलली आहे. सामूहीक निर्णयाचे वारे आता राजकारणात चालेल म्हणून कदाचित शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या प्रक्रियेत खंड पडेल अशी शंका व्यक्त केली आहे”, असे शिरसाट म्हणाले.

पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे शपथविधीसाठी घाई

पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी घाई केली जात असल्याची शंका संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. कोणत्या गोष्टीची भीती त्यांना सतावत होती याबाबत सध्या भाष्य करणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. “पद अजित पवार यांच्या गटाकडेच जाणार होते तर घाई का केली जातेय? याबाबत आठ दिवसानंतरही प्रक्रिया करता आली असती”, असे शिरसाट म्हणाले.

फडणवीसांच्या निर्णयाला पाठिंबा देणे क्रमप्राप्त

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत याची शरद पवारांना माहिती नसल्याचे त्यांनी म्हटलंय याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, “सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत शरद पवारांना विचारलं गेलं नसावं. त्यांच्या पक्षाचे राजकीय सल्लागार आणि नेते यांनीच ठरवून हा निर्णय घेतला असावा. पवारांना याबाबत किती माहिती आहे याबाबत आता सांगणे शक्यही नाही.”

तसेच, “देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील त्याला पाठिंबा देणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. याविरोध करण्याची आमची मानसिक तयारीही नाही”, असेही शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केले. “राष्ट्रवादीचा अध्यक्ष हा पवार कुटुंबातीलच होईल हे जवळपास निश्चित आहे. भाजपा किंवा आम्ही (शिवसेना) राष्ट्रवादीच्या भूमिकेला समर्थन देणार आहोत”, असे शिरसाट म्हणाले.