मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजविताना प्री-कास्ट तसेच जिओ पॉलिमर टेक्नो पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १४ विभागांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्ममंत्री शिंदे यांनीही या समस्येकडे लक्ष घातले आहे.
चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणींबाबत आयोजित बैठकीत शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात चाकण-तळेगाव पट्ट्याचे महत्त्व लक्षात घेता वाहतूक कोंडीचा प्रश्न अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांतून सोडवावा, पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरुस्तीला मर्यादा येत असल्याने ठाणे-नाशिक मार्ग आणि कशेडी बोगद्याच्या धर्तीवर प्री-कास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा पर्याय वापरावा, असे शिंदे यांनी सांगितले. रस्त्यांची कामे रखडविणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
चाकण परिसरातील रस्ते, पाणी, वीज, मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापन या परस्परांशी संबंधित सुविधांचा एकत्रित आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. जिल्हाधिकारी दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेणार आहेत.
चाकण शहराचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला विकास आराखडा लवकरच मंजूर केला जाईल, अशी घोषणा शिंदे यांनी केली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र, रुग्णालये आणि नवीन विद्युत उपकेंद्रासाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. उरण-कर्जत-राजगुरुनगर-शिरूर-पुणे महामार्ग तसेच छत्रपती संभाजीनगर-रांजणगाव-चाकणला जोडणाऱ्या समर्पित मालवाहतूक मार्गामुळे या परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
