पक्ष एकसंध ठेवण्याचे सांगलीत भाजपपुढे आव्हान

स्थायी समितीच्या सभापती निवडीत कसोटी

(संग्रहित छायाचित्र)

दिगंबर शिंदे

महापालिका स्थायी समिती सभापती निवडीवर आगामी महापौर निवडीचे सावट असल्याने भाजप नेत्यांची कसोटी लागणार आहे. भाजपमध्ये बेदिली माजली तर लोण्याचा गोळा आपल्या पदरात पडतो का अशा आशाळभूत नजरेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही जण असले तरी काँग्रेसअंतर्गत असलेली गटबाजी मोठा अडसर ठरणार आहे.

स्थायी समितीमध्ये १६ सदस्य असून यापैकी आठ सदस्य निवृत्त झाले होते. ३१  ऑगस्टलाच सभापतींची मुदत संपली होती. नगरविकास विभागाने ऑनलाइन सभेत सदस्य निवडीचे आदेश दिल्याने आठ नवीन सदस्यांची निवड झाली. यामध्ये भाजपचे ५, काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक सदस्य निवडले गेले.

स्थायी समितीमध्ये भाजपचे ९ तर विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे ७ सदस्य आहेत. महापालिकेत सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांचा समावेश आहे. सत्ता वाटप करीत असताना एका शहराकडे महापौरपद, दुसऱ्या भागाकडे उपमहापौर तर तिसऱ्या भागाला स्थायीचे सभापती पद असे वाटप अलिखित स्वरूपात आहे. भाजपचे पहिले महापौर म्हणून मिरजेच्या संगीता खोत यांना संधी देण्यात आली. सध्याच्या महापौर गीता सुतार सांगलीच्या आहेत, तर उपमहापौरपद आनंदा देवमाने यांच्या रूपाने मिरजेला मिळाले आहे. भाजपच्या कालावधीत कुपवाडला पदाचा लाभच झालेला नाही, यामुळे कुपवाडकरांचा स्थायीसाठी आग्रह आहे.

गेल्या सभापती निवडीवेळीही कुपवाडच्या गजानन मगदूम यांचा आग्रह होता. मात्र पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी आवटी यांना संधी देत असताना मगदूम यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला. आता त्यांचा आग्रह आहेच, पण तीन वेळा नगरसेवक म्हणून काम केलेले मिरजेचे पांडुरंग कोरे यांचाही सभापतीपदासाठी आग्रह आहे. तसेच सांगलीतील सविता मदने यांनी गेल्या वेळी महापौर पदासाठी आग्रह धरला होता. मात्र त्यांना स्थायीमध्ये संधी देण्याचे मान्य करून गीता सुतार यांना महापौर पद देण्यात आले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा स्थायीसाठी आग्रह धरला असून त्यांच्यासाठी पक्षातील एका जेष्ठ नेत्यांचा आग्रह आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऐनवेळी भाजपमध्ये बंडखोरीला खतपाणी घालण्यासाठी काँग्रेस सदस्यांचा कौल घेतला जाऊ शकतो. भाजपची असलेली सत्ता आणि स्थायी समिती विरोधकांकडे याचा वेगळा संदेश राज्य पातळीवर जाण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील राहणार. हे निश्चितच. राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसच्या तुलनेत मतभेदांची दरी अधिक आहे. काँग्रेसची सदस्य संख्या राष्ट्रवादीपेक्षा जादा असली तरी तीन गटांत विभागली आहे. विद्यमान विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांचा दोन वर्षांचा कारभार प्रभावहीन ठरला आहे, तर त्यांना बदलण्याची मागणीही जोर धरत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून युवक जिल्हाध्यक्ष असलेले नगरसेवक मंगेश चव्हाण यांनाही बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सभापती पदासाठी आग्रही असलेले गजानन मगदूम हे अपक्ष  निवडून येऊन भाजपचे सहयोगी सदस्य झाले आहेत. त्यामुळे पक्षाची विचारधारा, पक्षनिष्ठा या गोष्टी त्यांच्या खिजगणतीत आहेत का? जर संधी दिली नाही तर, बंडखोरी होणार असे चित्र निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादी-काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू आहे. हेच भाजपचे  खरे दुखणे आहे. तसा संदेश जाऊ नये यासाठी पक्षात बेदिली माजणार नाही याची दक्षता पक्षाला घ्यावी लागणार आहे. त्यात आणखी दोन आमदार असलेल्या पक्षाला जनमतात चांगला संदेश देण्यासाठी आणि पक्ष एकसंध असल्याचे निदान दाखविण्यासाठी तरी बंद दाराआडच मतभेद मिटवावे लागणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीचे डावपेच स्थायी समितीवर बरेच अवलंबून आहेत.

स्थायी सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर स्थायीमधील सर्व सदस्यांची भूमिका पाहूनच निर्णय घेतला जाईल. याबाबत अंतिम निर्णय पक्षनेत्यांना विचारूनच घेतला जाईल. पक्ष ज्याला संधी देईल त्याच्या पाठीशी सर्वजण राहतील. सध्या तरी करोनामुळे या निवडीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.

– शेखर इनामदार, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक

गेली पंधरा वर्षे नगरसेवक म्हणून काम करीत आहे. यावेळी स्थायीचे सभापतीपद मिळावे अशी अपेक्षा नेत्यांकडे व्यक्त केली आहे. तरीही पक्ष हितासाठी पक्षाकडून कोणताही निर्णय घेतला तरी तो मला मान्यच असेल.

– पांडुरंग कोरे, स्थायी सदस्य

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Challenge for sangli bjp to keep the party united abn

ताज्या बातम्या