हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : शेतकरी कामगार पक्ष आज ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. या वाटचालीत पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. एकेकाळी राज्याचे विरोधी पक्षनेतेपद भूषवणारा हा पक्ष अलीकडच्या काळात रसातळाला गेला आहे. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यात शेकापचा एकही आमदार गेल्या निवडणुकीत निवडून आलेला नाही. त्यामुळे आगामी काळात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पक्षाला व्यापक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याचबरोबर नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

Khadakwasla, Baramati, Ajit Pawar,
‘बारामती’साठी खडकवासल्यात मोर्चेबांधणी, महायुतीचा फौजफाटा सात दिवस राखीव ठेवा; अजित पवारांची सूचना
Buldhana Lok Sabha constituency, independent candidate, won, history of buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, buldhana news,
बुलढाणा: सात दशकात अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळलाच नाही! यंदा चमत्कार घडणार का? चर्चेला उधाण
pune bjp marathi news, pune bjp lok sabha seats marathi news, pune bjp loksabha election marathi news
पुणे जिल्ह्यात भाजपची कोंडी
Naxalites active again in Lok Sabha election hype Brutal killing of tribal citizen in Gadchiroli
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नक्षलवादी पुन्हा सक्रिय; गडचिरोलीत आदिवासी नागरिकाची निर्घृण हत्या

२ ऑगस्ट १९४७ साली या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न घेऊन चळवळ उभारण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून या कालखंडात करण्यात आले. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर कालखंडात पक्ष मोठय़ा प्रमाणात वाढला. राज्याचे विरोधी पक्षनेतेपद भूषवण्याची संधी शेकापला मिळाली. नारायण नागू पाटील, दि. बा. पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, गणपतराव देशमुख, एन. डी. पाटील यांनी पक्षाच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र प्रभाकर पाटील यांच्या मृत्यूनंतर पक्षाला उतरती कळा लागण्यास सुरुवात झाली. पक्षासाठी आयुष्य वेचणारे दि. बा. पाटील, दत्ता पाटील, रामशेठ ठाकूर यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पक्षाला सोडून गेले. नवीन नेते पक्षात यायला उत्सुक राहिले नाहीत. त्यामुळे पक्षाला उतरती कळा लागली.

राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविणारा शेकाप रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला होता. प्रतिकूल परिस्थितीतही निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू होते. आता मात्र रायगड जिल्ह्यातही पक्षाची परिस्थिती चिंताजनक आहे. पनवेल, उरण सारख्या शहरी भागात पक्षाची मोठी वाताहत सुरु झाली आहे. गेल्या काही निवडणुकांमधून याचीच प्रचिती येत आहे. मागील विधान सभा निवडणुकीत पक्षाचा एकही आमदार निवडून येऊ शकलेला नाही. शिवसेना आणि भाजप या पक्षांच्या वाढत्या प्रभावामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. विवेक पाटील, सुभाष पाटील, धैर्यशील पाटील या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोर जावे लागले आहे. या नंतर झालेल्या नगर पंचायत निवडणुकीतही पक्षाची पिछेहाट झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे खडतर परिस्थितीत पक्षाची पुनर्बाधणी करून वाटचाल करणे आव्हानात्मक ठरणार आहे.

आगामी काळात जिल्ह्यात ९ नगर परिषदा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे नव्या समिकरणांसह निवडणूकांना सामोरे जाता येईल का याची चाचपणी पक्षाला करावी लागणार आहे. जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थितीत लक्षात घेतली तर स्वबळावर निवडणुका लढवून स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता मिळवणे कुठल्याही एका पक्षाला शक्य होणार नाही. त्यामुळे युती आणि आघाडीच्या गणितांवर सत्तेचे समीकरण जुळणार आहे. त्यामुळे शेकापला आगामी काळात एका विश्वासू सहकारी पक्षाची नितांत गरज भासणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संबध ताणले गेले आहेत. शेतकरी कामगार पक्षाला घेतल्याशिवाय रायगड जिल्ह्याचे राजकारण शक्यच नाही. फक्त आणि फक्त कपटनीतीमुळेच शेकापक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र संघटना कधीच संपत नसते. पक्षातून अनेक गेले पण आजही शेकापक्ष उभा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शेकापक्ष गतवैभव प्राप्त करेल यात शंका नाही, असा विश्वास शेकाप नेते माजी आमदार सुभाष पाटील यांनी व्यक्त केला. ते शेकाप वर्धापन दिनाच्या तयारीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सहाण येथील आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना केला होता.

निवडणुकीत जो पराभव झाला तो माझा नाही तर संघटनेचा झाला आहे. त्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. असंख्य प्रसंग आले तरी आपण डगमगलो नाही. लोकशाही आहे त्यामुळे जय पराजय येत असतात. मात्र बचेंगे तो और भी लढेंगे. या ऊर्मीने आपल्याला पुन्हा उभे राहायचे आहे असा विश्वासही त्यांनी या वेळी बोलून दाखवला आहे.

जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होणे गरजेचे रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत समस्यांसाठी आजही जिल्ह्यात नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर शेकापची सत्ता असूनही हे प्रश्न सोडवता येत नाही याबाबत नाराजी आहे. त्यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरण्याची गरज आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, खारेपाटातील पाणी प्रश्न, अलिबाग रोहा मार्गाची दुरवस्था, अलिबाग मुरुड रस्त्याचे रखडलेले काम, सांबरकुंड, बाळगंगा, कोढाणे, काळ धरणग्रस्तांचे प्रश्न, खारभूमी योजना आणि त्यासंबधीचे प्रश्न, अलिबाग वडखळ मार्गाचे दुपदरीकरण या सारख्या प्रश्नासाठी शेकापने आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे.

नवा घरोबा? नव्या राजकीय समीकरणांची पक्षाकडून चाचपणी केली जाण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचा एक गट शेकापशी जुळवून घेण्यासाठी इच्छुक आहे. पण शिवसेनेतील तीन आमदारांच्या बंडखोरीमुळे त्याचा कितपत फायदा शेकापला होईल याचा आघाडी करताना विचार होण गरजेचे असणार आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पक्षाची वाटचाल कशी होते आणि त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश येणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.