मुंबई: राज्यातील आणखी ६० हजार मेट्रिक टन हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यात येणार असून खरेदी प्रक्रियेला २९ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच तूर खरेदीलाही ३१ मेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. यंदाच्या हंगामाकरिता हरभरा खरेदीची मर्यादा सुमारे ७ लाख ६१ हजार २५० मेट्रिक टन इतकी होती. ती ५८ हजार ६३२ मेट्रिक टनने वाढविण्यात आली आहे. तसेच खरेदीची मुदत २९ एप्रिल होती. ती वाढवून ३१ मे केल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी मुंबईत दादरच्या चंचल स्मृती येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

वाढीव खरेदीमुळे राज्यातील हरभऱ्याची खरेदीची मर्यादा यंदा ८ लाख १९ हजार ८८२ मेट्रिक टन वर पोहोचेल. यापूर्वीच्या मर्यादेपेक्षा ही वाढ मोठी असून यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल, असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला. ज्या राज्यांचा हरभरा खरेदीचा कोटा पूर्ण होणार नाही, तोही महाराष्ट्राला देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे, अशी माहिती रावल यांनी दिली.आतापर्यंत ३ लाख ७ हजार ९७३ शेतकऱ्यांकडून ७६ लाख १२ हजार ४९९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी मुदत संपल्याने संकेतस्थळे बंद पडून खरेदी थांबली होती. मुदतवाढीमुळे ही खरेदी पुन्हा सुरू होईल.

सुरुवातीला केंद्र सरकारच्या किमान हमीभाव किंमत योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी ९० दिवसांचा तर हरभरा खरेदीसाठी ६० दिवसांचा कालावधी मंजूर करण्यात आला होता. मात्र राज्यातील शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची सातत्याने मागणी होत होती. त्यानुसार तूर खरेदीला ३१ मेपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील ९५० केंद्रांवर तूर डाळीची खरेदी केली जात आहे. खरीप हंगामाकरिता राज्याला ३ लाख ३७ हजार मेट्रिक टन तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ३७ हजार ८०१ शेतकऱ्यांकडून ६ लाख ८२ हजार ३७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.