राज्यात अतिवृष्टी सुरु आहे. काही भागांमध्ये पूरस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात वारे वाहात आहेत. त्यामुळे दरड कोसळणं, पाणी साठणं हे सगळे प्रकार होत आहेत. आपला आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सगळ्या जिल्ह्यातले जिल्हाधिकारी, विभाग प्रशासन यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. त्यांनी काय नियोजन केलं आहे याचा आढावा मी घेतला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आज दुपारी ३ वाजता भरती
मुंबईत आज दुपारी ३ वाजल्यापासून भरती असणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणी साठण्याची शक्यता आहे. तसंच अतिशय वेगवान वारे वाहतील, रविवारीही दिवसभर ४० ते ५० किमी प्रति तास असे वारे वाहात होते. साधारणपणे चार महिन्यांत जे वृक्ष पडतात त्या संख्येच्या निम्मी म्हणजेच ३५० झाडं पडली. दुपारनंतर रात्री पर्यंत वारे वाहणार आहे त्यामुळे झाडं आणखी कोसळू शकतात असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मानखुर्द मधली जी घटना आहे त्या ठिकाणी झोपडीत जे लोक राहात होते तिथले सहा लोक गेले आहेत. मात्र आपण सगळ्या भागांमध्ये अलर्ट दिले आहेत. जनतेलाही विनंती आहे की झाडं वगैरे पडू शकतात. अनपेक्षित गोष्टीही होण्याची शक्यता आहे. महिन्याभराची जी सरासरी असते तेवढा पाऊस चार दिवसांत मुंबईत पडला आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच मोठ्या प्रमाणावर हानी होताना आपल्याला दिसते आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
सर्वात मोठा अलर्ट नाशिकला आहे, ढगफुटी होऊ शकते-देवेंद्र फडणवीस
सर्वात महत्त्वाचा अलर्ट हा नाशिकला आहे. अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट तयार होतो आहे. त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे तिथे ढगफुटी होऊ शकते असे निर्देश मिळाले आहेत. नाशिकमध्ये ३०० एमएम पाऊस होऊ शकतो. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. नाशिक शहर, जिल्हा आणि ग्रामीण भाग या ठिकाणी ढगफुटीमुळे जी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यासाठीच्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत. कारण ही एक मोठी घटना घडू शकते. ८ जुलैपर्यंत हे सगळे अलर्ट आहे. मागील चार ते पाच दिवसांत पालघरला सर्वात मोठा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. गुजरातहून येणाऱ्या ट्रेन्सही थांबल्या आहेत. अहमदाबाद मुंबई हा जो नवा रस्ता होतो आहे तिथे काम सुरु असल्याने पाणी साठलं आहे. पालघर जिल्ह्यात दुपारी ४.३० च्या सुमारास भरती येणार आहे त्यामुळे पुन्हा पाणी साठण्याच्या घटना घडू शकतील.
राज्यात सगळीकडेच मोठ्याप्रमाणावर पाऊस-फडणवीस
रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. महाबळेश्वर, लोणावळा या ठिकाणी सरासरीपेक्षा प्रचंड जास्त पाऊस झाला आहे. सावित्री नदीने धोक्याची ओलांडली आहे. पण ते पाणी आपण थांबवू शकलो आहोत. चार नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यावरही आपलं लक्ष आहे. मुंबई-गोवा हायवे आहे तिथे कशेडीला एक डोंगर कोसळून खाली आला. तो सगळा ढिगारा उपसण्याचं काम चाललं आहे. या रस्त्यावर आठ ठिकाणी अनपेक्षित लँड स्लाईड झाल्या आहेत. मुंबई-पुणे रस्त्यावर जवळपास १०० टन ढिगारा उपसला जातो आहे. याआधी कधीही या ठिकाणी दरड कोसळलेली नाही. पुण्याकडे जाण्याच्या तीन लेन सुरु आहेत. तिथेही वेगाने काम चाललं आहे अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
