पुणे : ऐन दिवाळीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या दक्षिण भागांत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

श्रीलंका आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे देशाच्या दक्षिण भागात सध्या जोरदार पाऊस होत आहे. याच परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून, १ किंवा २ नोव्हेंबरपासून तीन ते चार दिवस राज्याच्या प्रामुख्याने दक्षिण भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी १ नोव्हेंबरपासून पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत काही भागांत १ नोव्हेंबरपासून तीन ते चार दिवस, तर पुणे, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी २ नोव्हेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज आहे.

अंदाज असा.. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी १ नोव्हेंबरपासून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्याच्या काही भागांत १ नोव्हेंबरपासून तीन ते चार दिवस, तर पुणे, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी २ नोव्हेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज आहे.