सांगली : पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसाने चांदोली धरणातील पाणीसाठा ७९ टक्के झाला असून, तो नियंत्रित राखण्यासाठी शनिवारी वारणा नदीत ४ हजार ५०० क्युसेक विसर्ग करण्यात आला. यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून, वारणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत ५६ मिलिमीटर, तर एक जूनपासून १२९२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या ३४.४० टीएमसी क्षमता असलेल्या चांदोली धरणात पाणीसाठा २७.३० टीएमसी झाला असून, क्षमतेच्या ७९ टक्के धरण भरले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणात २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.
पाणी धरणाच्या सांडवा पातळीहून अधिक आहे. जलाशय परिचलन नियमानुसार धरणातील पाणीपातळी नियंत्रित राखण्यासाठी शनिवारी दुपारी साडेबारा वाजल्यापासून वक्र दरवाजातून २८७० आणि पायथा विद्युतगृहातून १६३० असा एकूण ४५०० क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीतील पाणी पातळी वाढणार आहे. पाऊस सुरू राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. वारणा नदीची पाणीपातळी वाढणार असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, कोयना धरणाच्या ठिकाणी पावसाचा जोर ओसरला असला, तरी गेल्या २४ तासांत ६४ मिलिमीटर, तर पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर येथे ५५ आणि नवजा येथे ६८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणातील पाणीसाठा ५८.७७ टीएमसी झाला असून, तो क्षमतेच्या ५९ टक्के आहे. सांगली जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी ६.२ मिमी पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात १४.३ मिमी नोंदला गेला असल्याचे जिल्हा पूर नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.