Ex-MP Chandrakant Khaire reveals shocking details about Black Magic : अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील भोंदूगिरी समोर आली आहे. अनेक राजकीय नेते अशा भोंदूबाबांकडे जाऊन आपलं राजकीय भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, तसंच अघोरी कृत्य करत असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही आता एक धक्कादायक दावा केला आहे.

नाशिकचा भोंदूबाबा अघोरी कृत्ये करून लोकांकडून पैसे उकाळत होता. महिलांचं लैंगिक शोषण करत होता. पूजेच्या नावाखाली अघोरी कृत्यातून तो नागरिकांची दिशाभूल करत होता. यामध्ये केवळ सामान्य नागरिकच नव्हेतर अनेक मान्यवर मंडळीही होती. राजकारणी, अधिकाऱ्यांसह अनेकांची त्याच्याकडे उठबस असत. त्यापैकी रुपाली चाकणकर, दीपक केसरकर, विखेपाटील, चंद्रकांत पाटील आदींचे फोटो समोर आले आहेत. असं असतानाच चंद्रकांत खैरे यांनी धक्कादायक दावा केला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

“माझ्यावरही अघोरी पूजा झाली होती”, असा दावा चंद्रकांत खैरे म्हणाले. ते म्हणाले, “अघोरी पूजा माझ्यावरही झाली होती. मी धार्मिक आणि देवभक्त आहे, शक्ती माझ्याकडे आहे. माझ्यावर ज्याने अघोरी विद्या केली तो माणूस मरण पावला. तो माणूस मेला. इथेही देवेंद्र फडणवीसांना घालवण्यासाठी अघोरी कृत्य केलं. राजकीय लोकांनी बाबा लोकांकडे जाऊ नये.”

अशोक खरात प्रकरण काय?

महिलांचे लैंगिक शोषण, कित्येकांची फसवणूक, राज्यात ठिकठिकाणी मालमत्ता खरेदी, अशा कारणांमुळे गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन माहिती बाहेर येत आहे. खरातने कशाप्रकारे अत्याचार केले, त्याचे वर्णन ऐकूण कोणाच्याही अंगावर काटा येईल. परंतु, अशा भोंदूबाबाला बड्या राजकीय मंडळींनी, उद्योजकांनी, शासकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच मोठे केल्याचे त्याच्याबरोबर असणाऱ्या मंडळींचे समाज माध्यमात येणारे फोटो पाहून म्हणावे लागते. आपले राजकीय भविष्य कसे राहील, आगामी निवडणुकांमध्ये कसा निकाल लागेल,  हे जाणून घेण्यासाठी अनेक बडे राजकीय नेते खरातच्या दरबारात हजेरी लावत होते. लोकसभा निवडणुकीवेळी तर उत्तर महाराष्ट्रातील एका महिला नेत्याला खरातने त्यांच्या बाजूने निकाल लावून देण्यासाठी पूजा करण्यासही भाग पाडले होते, असे समोर येत आहे.