छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत शिंदेसेना तसेच उद्धवसेनेला धक्का बसला आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही पक्षांची अवस्था बिकट झाली आहे. एकूण ११५ जागांपैकी भाजपाने ५७ जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर शिंदेसेनेला फक्त १३ जागा मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर आरोप केले आहेत. खैरे यांनी ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वादावर चंद्रकांत खैरे म्हणाले, “आमच्या फक्त सहा जागा आल्या. त्यामुळे आम्ही दु:खी आहोत. अंबादास दानवे शेवटचे पाच-सहा दिवस कुठे होते, ते माहिती नाही. ते प्रत्यक्षात लोकांना भेटले नाहीत. त्यांनी माझे फोन उचलले नाहीत. महापालिका जिंकायची हे त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. ते स्वत:च काम करायचे, त्यांनी आम्हाला काम करू दिले नाही. ते कोणत्या पद्धतीने वागत आहेत ते माहिती नाही. त्यांना काहीतरी भवितव्य गाठायचं असेल म्हणून कदाचित ते तसं वागले असतील. त्यांचं वागणं आम्हाला कोणालाच आवडलं नाही.” दरम्यान, उद्धव ठाकरेंकडे अंबादास दानवे यांच्याबद्दल तक्रार करणार नसून त्यांना परिस्थिती सांगणार असल्याचे खैरे म्हणाले. पराभवाला अंबादास दानवेंना जबाबदार धरायचे की नाही, हे पक्ष ठरवेल असेही ते म्हणाले.

रशीद मामूंवर खैरे म्हणाले…

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रशीद मामूंचे नाव सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या तोंडी होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले रशीद मामू विजयी झाले. त्यावर खैरे म्हणाले, ज्या पद्धतीने रशीद मामू निवडून आले ते मला आवडले नाही. मला तर त्यांना उभंही करायचं नव्हतं. संभाजीनगरमध्ये रशीद मामू उभे राहिल्याने आमच्या निकालावर परिणाम झाला. रशीद मामूंना मी आजही मानत नाही. असे खैरे म्हणाले.

पराभव मान्य – अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाने शिवसेनेचा समूळ नायनाट केला आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, पराभव तर मान्य केलाच पाहिजे. रूपयाने कमाल केली आहे. जनतेचे प्रश्न भाजपानेच निर्माण केले, ते मिटवले नाहीत, त्याच पक्षाला जनतेने निवडून दिलं. सत्ता आणि पैशांचा उपयोग करून भाजपाने यश संपादन केले आहे. अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.