भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या काँग्रेसचा आणि विशेषत: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा जोर वाढला आहे. चंद्रकांत पाटील देखील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये फिरत आहेत. यादरम्यान, देगलूर मतदारसंघात बोलताना त्यांनी मतदारांना अजब ऑफर दिली. चंद्रकांत पाटील यांच्या या ऑफरची चर्चा दिवसभर नांदेडमध्ये सुरू होती. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला देखील लगावला.

“मी स्वत: जेवणाला उपस्थित राहणार”

चंद्रकांत पाटील देगलूर-बिलोली मतदारसंघात प्रचार करताना मतदारांसोबतच भाजपाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत देखील चर्चा करत आहेत. अशाच एका बैठकीमध्ये त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना थेट ऑफर देऊन टाकली. यामध्ये ज्या गावात भाजपाला एकूण मतदानाच्या ७० टक्के मतं मिळतील, तिथे माझ्याकडून गावजेवण घातलं जाईल, असं पाटील म्हणाले आहेत. त्यासोबतच, ज्या प्रभागांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, तिथल्या अध्यक्षांना विशेष बक्षीस देखील दिलं जाईल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. विशेषत: या सर्व गावांमध्ये गावजेवणाला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या ऑफरची चर्चा होत असताना अशोक चव्हाण यांनी त्यांना खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. “गावजेवण एक दिवस देणार की पुढची तीन वर्ष, हे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करावं”, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. त्यामुळे या गावजेवण प्रकरणावरून नांदेडमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

नांदेडमध्ये भाजपाला खिंडार

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात भाजपाला खिंडार पडलंय. देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपातील दुफळी उघड झालीय. माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भास्कर पाटील खतगावकर यांच्यापाठोपाठ त्यांच्या सूनबाई मीनल खतगावकर यांनी देखील भाजपाला रामराम ठोकला आहे. जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. भास्कर पाटील खतगावकर हे अशोक चव्हाण यांच्या बहिणीचे पती आहेत. ७ वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. पण आता त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे.