सातारा : … अन् पहाटेच चंद्रकांत पाटील पोहोचले राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर विजयी उमेदवाराच्या घरी!

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झालेल्या ज्ञानदेव रांजणेंचे भेटवस्तू देऊन केले अभिनंदन केल्याने नव्या चर्चांना उधाण

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव करून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी आंबेघर(ता.जावळी) येथे आज पहाटेच पोहोचून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. एवढेच नाही तर चंद्रकांत पाटील यांनी रांजणे यांना भेटवस्तू देखील दिली.

भल्या पहाटे भाजपा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराचे अभिनंदन करण्यासाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

तसेच, स्थानिक निवडणुकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य देणारी आपली पार्टी आहे. पक्षाच्या चौकटीतच सर्व काही करायला पाहिजे असे बंधन आमचे नसते. असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव करणारे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार आणि आमदार शिवेंद्रराजे यांचे निष्ठावंत समर्थक ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी भल्या पहाटे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अचानक दिलेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर उपस्थित होते. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी आमदार महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधत त्यांच्याशी काही गोष्टींबाबत चर्चा केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

…म्हणून राजणेंची भेट घेतली –

”मी आज रांजणे यांची सदिच्छा भेट घेतली. मी विद्यार्थी चळवळीतून आलेला माणूस आहे. संघर्ष करत आलोय. त्यामुळं संघर्ष करणाऱ्या माणसाबद्दल मला अप्रूप असतं. मी तशा लोकांना भेटतो. मी त्यांना भेटल्यामुळं रांजणेंची निष्ठा बदलत नाही. कुठल्याही दबावाला ते बळी पडले नाहीत याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आलो.”, असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तसेच, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची सूत्रे भाजपाकडे येत असतील तर लागेल ती मदत करू, असंही ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandrakant patil congratulated gajanan ranjane msr