दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना शनिवारी अटक करण्यात आल्यानंतर आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांच्या जामीनावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची कारागृहात पाठवण्यात आले आहे. यावरुन भाजपा नेते आक्रमक झाले असून त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राणा दाम्पत्यावर भादवि. कलम १५३ (अ) (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि कलम १३५ मुंबई पोलीस कायदा (पोलिसांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निर्णयानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“उत्तम! हिंदू धर्मियांचा पवित्र “हनुमान चालिसा” म्हणणे हा शिवसेनेच्या राज्यात राजद्रोहाचा गुन्हा ठरला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत “बुडवून दाखवलं”!” असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुनावणीच्या सुरुवातीला सरकारी वकीलाकडून राणा दाम्पत्याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. वकील रिझवान मर्चंट यांनी रवी राणा आणि नवनीत राणांची बाजू मांडली तर प्रदीप घरत यांनी सरकारची बाजू मांडली.  “मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केलं. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला,” असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.

दुसरीकडे, राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट म्हणाले की, “राणा दाम्पत्याने राज्य सरकारच्या विरोधात वक्तव्य केल्याचे सिद्ध करणारा एकही पुरावा सरकारी वकील सादर करू शकले नाहीत. या लोकांना हनुमान चालिसाचे पठण करायचे होते आणि प्रार्थना करणे गुन्हा नाही. हनुमान चालिसामध्ये रामाची स्तुती केली आहे. देशात हनुमान चालीसा वाचणे गुन्हा ठरला असेल तर सर्व मंदिरांना टाळे ठोकले पाहिजेत.”