scorecardresearch

“दाऊद बिचारा इथे यायला घाबरतो आणि हे…”, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर खोचक निशाणा!

चंद्रकांत पाटील म्हणतात, “गेल्या २० दिवसांत नवाब मलिकांच्या खात्याच्या फाईल्स कोण सह्या करतंय हा मला प्रश्न आहे. की जेलमध्ये पाठवता सह्या करायला? ”

“दाऊद बिचारा इथे यायला घाबरतो आणि हे…”, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर खोचक निशाणा!
चंद्रकांत पाटील यांची नवाब मलिक प्रकरणावरून राज्य सरकारवर खोचक टीका!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे दाऊदशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं अटक केली असून सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांच्याकडची खाती किंवा त्यांचं मंत्रीपद अद्याप काढून घेण्यात का आलं नाही? असा सवाल भाजपाकडून विचारण्यात येत आहे. नवाब मलिक प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका करताना आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दाऊदसंदर्भात राज्य सरकारवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

“सरकार आल्यापासून फक्त धमक्या”

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून फक्त धमक्या दिल्या जात असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. विधानभवनात माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “तुमचं सरकार येऊन २८ महिने झाले. तुम्ही फक्त धमक्याच देत आहात. आमचा कुणी दोषी असेल, तर तो गुन्ह्यात दोषी ठरेल, आम्ही घाबरत नाही. तुम्ही उत्तर द्या, २० दिवस झाले, एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये असतो आणि तुम्ही त्याचा राजीनामा घेत नाहीत. सरकारी नोकराला अटक झाली, की २४ तासांत निलंबित करावं लागतं असा नियम आहे. तुम्ही त्याच्या वर जात आहात का?” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

“किमान खाती तरी काढून घ्या”

नवाब मलिक यांच्याकडची खाती तरी काढून घेण्यात यावीत, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. “तुम्ही वारंवार आरोप करत आहात की भाजपा यंत्रणा वापरते. पण आता कोर्टानंच जामीन नाकारला. तुमचे ते खूप लाडके असतील, दाऊदचा दबाव असेल, तर किमान खाती तरी काढून घ्या. गेल्या २० दिवसांत त्यांच्या खात्याच्या फाईल्स कोण सह्या करतंय हा मला प्रश्न आहे. की जेलमध्ये पाठवता तुम्ही सह्या करायला? त्यांच्या विभागाला कुलूप ठोकलं का?” असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला आहे.

“राज्यातल्या अजून किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल”, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा!

“नैतिकता लांब, हा व्यवहार आहे. न टिकणाऱ्या केसेस दरेकर, प्रसाद लाड, बावनकुळेंवर लावायच्या. पण जी कोर्टात टिकली आहे, त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही. दाऊदचा दबाव असायला पाहिजे म्हणजे किती असायला पाहिजे. तो बिचारा घाबरतो इथे यायला आणि हे त्याला घाबरतायत”, असा खोचक टोला पाटील यांनी यावेळी बोलताना लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.