Chandrakant Patil On Jayant Patil : गेल्या काही महिन्यांत राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा अनेकदा रंगल्याचं पाहायला मिळालं. मात्र, त्यानंतर जयंत पाटील यांनी स्वत: या चर्चा फेटाळून लावल्या. पण आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. माजी खासदार संजयकाका पाटील आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं होतं. ‘जयंत पाटील भाजपामध्ये जाण्यासाठी आग्रही होते’, असं संजयकाका पाटील यांनी म्हटलं. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या सर्व प्रक्रियेचा मी एक भाग होतो’, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
“जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाचे संजयकाका पाटील हे फक्त साक्षीदार आहेत. मात्र, मी त्या प्रक्रियेतील ‘पार्ट अँड पार्सल’ आहे. त्यामुळे आता मला जास्त बोलायला लावू नका. जयंत पाटील मला नेहमी उपरोधीकपणे म्हणतात की मी त्यांचा मित्र आहे. तसं जयंत पाटील देखील माझे मित्रच आहेत. त्यामुळे एवढ्या ओपन बोलायला नको. अन्यथा त्यांना त्रास होईल”, असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
संजयकाका पाटील काय म्हणाले होते?
सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आमदार जयंत पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्यावर खोचकपणे टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजयकाका पाटील म्हणाले होते की, “जयंत पाटील स्वतः भाजपामध्ये जाण्यासाठी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी किती वेळा उंबरे झिजवले याचा मी स्वतः साक्षीदार आहे”, असं संजयकाका पाटील यांनी म्हटलं होतं.
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले होते?
सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडली. या जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने भाजपाचा पराभव केला. या निवडणुकीनंतर बोलताना जयंत पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले होते की, “संजयकाका पाटील यांना आपणच भाजपामध्ये पाठवलं होतं. त्यांनी पलिकडे जाऊन आम्हालाच मदत केली, यामुळे आम्हाला नव्याने रणनीती आखण्यात मदत झाली”, असा दावा जयंत पाटील यांनी केला होता.
