Chandrakant Patil On Shambhuraj Desai : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, असं असतानाच भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपाला मोठा इशारा देणारं वक्तव्य केलं. ‘आमची भूमिका ठरवणारा भाजपा कोण?’, असं म्हणत शंभूराज देसाई यांनी भाजपाला खडेबोल सुनावले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ‘राजकारणात सगळं गणित हे संख्येशी जोडलेलं असतं’, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले?
“शंभूराज देसाई हे माझे चांगले मित्र आहेत आणि नेतेही आहेत. त्यामुळे मित्राला काहीही बोलता येतं, तसं ते बोलले असतील. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा मला अजिबात राग नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की राजकारणामध्ये सगळं गणित हे भावनेशी जसं जोडलेलं असतं तसं संख्येशी देखील जोडलेलं असतं”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
शंभूराज देसाई यांनी काय म्हटलं होतं?
“आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण? भाजपा आणि आम्ही वेगवेगळं लढलो. आमच्या धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांचं कमळाचं चिन्ह होतं, त्यांच्या कमळाच्या विरोधात आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं. आम्ही वेगवेगळं लढलो आहोत. मग वेगळं लढल्यानंतर देखील गरज भासली की म्हणायचं की ते आमचेच आहेत. मग आमची भूमिका ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही आमची भूमिका ठरवू. आम्ही आमचे निर्णय घेऊ, निवडणुकीला उभ राहणं आणि निवडून येणं हे आमच्या हातात आहे. निवडून आल्यानंतर काय भूमिका घ्यायची? याबाबत शिवसेनेमध्ये आदेश चालतो आणि तो आदेश एकनाथ शिंदे आम्हाला देतील”, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं होतं.

