देवेंद्र फडणवीस हे सर्वगुणसंपन्न आहेत. ते अनेक भूमिका लीलया पार पाडतात, असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. रविवारी ‘देवाभाऊ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्यांनी म्हटले की, एक तर नक्की आहे, या माणसाला काहीतरी दैवी शक्ती मिळाली आहे. कारण एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील म्हणाले, “एक तर नक्की आहे, या माणसाला (देवेंद्र फडणवीस) काहीतरी दैवी शक्ती मिळाली आहे. कारण एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात. म्हणजे तो संघटकही असतो, राज्यकर्ताही असतो, मित्रही असतो, तो वाचतोही प्रचंड, लिहतोही प्रचंड, तो कुटुंबवत्सलही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील घटना लक्षात ठेवून तो अभिनंदन करतो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. देवेंद्रजी हे नाव असं आहे की त्यांच्याबाबतीत पुस्तक आहे म्हटल्यावर मी नाही म्हणू शकलो नाही. पुस्तकाच्या विविध चॅप्टर्सची माहिती मी घेतली. देवाभाऊंवर किमान २५ ते ३० पुस्तकं झाली आहेत. त्यातलं वेगळं पुस्तक हे देवाभाऊ आहे असं मला वाटतं. कारण या पुस्तकात त्यांचं बालपण, शाळा सोडली तो प्रसंग इथपासून सगळेच प्रसंग आहेत असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटील यांचा रोख उद्धव ठाकरेंकडे?

एका माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले, मी त्या माजी मुख्यमंत्र्यांचं नाव सांगणार नाही, मी केवळ वर्णन करेन, तुम्हाला समजून जाईल, असं ते म्हणाले. या मुख्यमंत्र्यांकडे कोणत्या कामाचा प्रस्ताव घेऊन गेल्यानंतर ते उभे राहायचे. तुमचं निवेदन वाचायचे आणि त्यावर पेनाने खुणा करायचे. लोकांना वाटायचं की, मुख्यमंत्री इतक्या गांभीर्याने निवेदन वाचत आहेत म्हणजे काम करायला घेतील. पण नंतर हे मुख्यमंत्री ते काम करायचे नाहीत. याबाबत पुन्हा विचारणा केल्यानंतर मुख्यमंत्री सांगायचे की, ‘मी नंतर सांगतो तुम्हाला’. १०० पैकी ९९ जणांना असंच उत्तर मिळायचं. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांचे काका पुण्यात राहतात हे अनेकांना आज कळलं असेल-चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस हे पुण्यात राहतात हे आज अनेकांना कळलं असेल. कारण हे सगळेच जण म्हणजेच सगळेच फडणवीस कुटुंबीय लो प्रोफाइल राहतात. आपलं काम अतिशय शांतपणे करतात. बाळासाहेब फडणवीस यांनी भारतीय मजदूर संघाचं अध्यक्षपद भुषवलं आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण करणारी त्यांची संस्था आहे. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठीही ते काम करत आहेत अशीही माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.