संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा १८,९०१ मतांनी विजय झाला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिल्या महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. तर या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर प्रतिष्ठा पणाला लागलेल्या चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

“मतदारांनी दिलेला निर्णय मान्य करावा लागतो आणि मतदारांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. या निवडणुकीत आमचा मुद्दा हा विकासाचाच होता. तुम्हा ५० वर्षात काय केले हे मांडा असे आम्ही म्हणत होतो. आम्हाला राज्यात पाच वर्षे आणि केंद्रात सात वर्षे मिळाली. आम्ही आतापर्यंत काय केले आणि पुढे काय करणार आहोत ते मुद्दे मांडले,” असे जयंत पाटील म्हणाले.

“भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७,४१६ मते पडली आहेत. तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी ही लढत झाली. तिन्ही पक्षांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लागली आहे असे काम केले. असे असूनही आम्ही एकट्याने ७७ हजारांपेक्षा अधिक मते मिळवली. शेवटच्या पाच सहा फेऱ्यांमध्ये काहीही होऊ शकते अशी ही निवडणुक होती. निवडणुकीमध्ये यश अपयश असते. इंदिरा गांधी यांना पंतप्रधान असतानाही पराभव स्विकारावा लागला होता. आपल्या देशातल्या लोकशाहीची सुंदरता अशी आहे की, झोपडपट्टीतल्या माणसाचे एक मत असते आणि वर्षाला सव्वासहा लाख कोटींचा व्यवसाय असणाऱ्या मुकेश अंबांनींचे एक मत असते. दोघेही कोणाला मतदान करणार आहेत हे सांगत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी दिलेला कौल सर्वांना मान्य करावा लागतो. प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यानंतर यश मिळणे आपल्या हातात नसते,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

हिमालयात जाण्यासंदर्भातल्या विधानावरुन खुलासा

“आमचे नाना कदम लढले, तर तुमच्या तोंडाला फेस आला. मग मी लढलो तर काय होईल? मी असं म्हटलं होतं की मी लढलो आणि जिंकलो नाही तर मी हिमालयात जाईन. मी लढलोच नाही ना. नानाच लढले. अक्षरश: फेस आला तुमच्या तोंडाला. इथे तर कमी मतांनी विजय आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असताना यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणुकीत उतरलेले आणि आता भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना भाजपने उमेदवारी दिली होती. गेले काही दिवस मविआ आणि भाजपाच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडत राहिल्या. त्यामुळे आता या निकालाकडे सर्वाचेंच लक्ष लागले होते.