भाजपाची आणीबाणी मोडून काढायची तर दिल्लीत शिवसेनेसारखा पक्ष हवा. त्यासाठी इतर राज्यांतही शिवसेना वाढवण्यासह महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकण्याच्या जिद्दीनेच लढूया, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला आहे. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर जे भाषण केले ते आधीच्या आणि आताच्या दसऱ्याला केलेल्या भाषणासारखे होते. त्यांचा  आपण कसे चुकले हे दाखवण्यासाठीचा थयथयाट सगळ्या भाषणांमध्ये सारखा आहे. निराक्षा व्यक्त करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसून ही भाषा योग्य नाही. सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे पण यांची भाषा ही सारखी तोडेन, ठोकेन, दाखवून देईन अशी आहे. त्यामुळे याचा सुद्धा सर्वसामान्य माणसाने विचार करण्याची वेळ आली आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

“४३ नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. डोळ्यासमोर आपल्या पक्षाचा ऱ्हास होत चालल्याचे दिसते तेव्हा माणूस निराश होतो आणि तेच उद्धव ठाकरे करत आहेत. आदित्य ठाकरेंनी राजभवन हा भाजपाचा अड्डा झाल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री एका राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षालाही भेटायला तयार नाहीत. महाराष्ट्रात घटनेनुसार राज्यपाल सर्वोच्च आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे भेटायला गेलो. तुम्ही उपलब्धच नाही आहात. त्यामुळे असाल तर प्रताप सरनाईकांविरोधात कारवाई करा. त्यामुळे सगळेच विषय अंगाशी आल्याने शिवसेना त्रस्त आहे आणि वारंवार हिंदुत्वाचे विषय काढत आहे. हिंदुत्व सोडले आहे की नाही हे काँग्रेसला सांगा आम्हाला सांगण्याची गरज नाही,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

“मला उद्धव ठाकरेंच्या २७ महिन्यांच्या कालावधीमध्ये कोविडच्या सुरुवातीलाच फोन आला होता. आम्ही वेगवेगळ्या निमित्ताने त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला तरीही ते भेटले नाहीत. आजारपणातही ते उपलब्ध नव्हते. २७ महिन्यांत आमची भेट झाली नाही आणि आमच्या पत्रांना उत्तरेही मिळाली नाहीत. वाढदिवसानिमित्त फोन केल्यानंतर मिलिंद नार्वेकर फोनवर येतात आणि लावून देतो म्हणतात पण फोन लावला जात नाही. अजित पवार हे इच्छा व्यक्त केली की भेटतात,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

नाना पटोलेंना निरीक्षणाखाली ठेवण्याची गरज – चंद्रकांत पाटील

“नाना पटोलेंना काँग्रेस पक्षाने थोडं निरीक्षणाखाली ठेवायला पाहिजे. पंजाबच्या घटनेनंतर नाना पटोले पंतप्रधान मोदी नाटक करत आहेत आणि गृहमंत्री अमित शाह यांचा हा प्लॅन होता असे म्हणतात. त्यानंतर ते मी मोदींना मारेन असे एका गावगुंडाला म्हटलो असे म्हणाले. या सर्वातून नाना पटोलेंचा हेतू काय आहे. त्यांच्या नेत्यांनी देशाच्या पंतप्रधांविरोधात असे म्हटले तर प्रसिद्धी मिळते असे सांगतिले आहे. या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी नाना पटोलेंचा निषेध नोंदवण्यात येत आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil reaction to uddhav thackeray appeal to shiv sainiks abn
First published on: 24-01-2022 at 13:00 IST