सांगली : सांगली जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी, नशेखोरी पाहता स्थिती चिंंताजनक असली तरी नियंत्रण ठेवण्यात पोलीस प्रशासन सक्षम असल्याचा निर्वाळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
पालकमंत्री पाटील यांनी पोलीस प्रशासन, महापालिका आणि महसूल विभागातील कामाचा आढावा घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. पोलीस ठाण्यात दाखल होत असलेल्या काही घटनामुळे काही प्रकारात घट तर काहीमध्ये वृध्दी झाली आहे. समाजमन गुन्हेगारी वाढली असल्याचे दर्शवत असून गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच काही पोलीस वाहनावरही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली असून या वाहनांची गस्त वाढविण्यात आली आहे. गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी गुंडा विरोधी पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांची पडताळणी करण्यास सांगण्यात आले असून अनावश्यक परवाने स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात अंमली पदार्थाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर एक आठवडा जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती पदयात्रा काढणार असून या माध्यमातून महाविद्यालय, शाळांना भेटी देणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्रातील घरफाळा वाढीसंदर्भात काही मुद्दे उपस्थित केले जात असून याची पडताळणी समितीद्वारे केली जाईल, मात्र जर विकास निधी हवा असेल तर करवाढ स्वीकारावीच लागेल. नगरविकास विभागाकडून तसे आदेश देण्यात आले असून सर्वच महापालिका क्षेत्रात भांडवली मुल्यावर आधारित कर आकारणी केली जात आहे. महापूर नियंत्रणासाठी ६२० कोटींचा निधी जागतिक बँकेकडून मिळाला असून यातून नाल्यांचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. सांगली, कोल्हापूरला असलेला महापूराचा धोका रोखण्यासाठी अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा प्रस्ताव असून यासाठी जागतिक बँकेकडून दहा हजार कोटींचा निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
