“उद्धव ठाकरे सरकारी रुग्णालयात का दाखल झाले नाहीत?”; फडणवीसांचा उल्लेख करत चंद्रकांत पाटलांचा सवाल

राज्यातल्या इंधन दरवाढीवर तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रती सरकारच्या भूमिकेबद्दलही चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

(प्रातिनिधिक संग्रहित छायाचित्र)

राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांची खडाजंगी पाहायला मिळत आहे. विषय वेगवेगळे असले तरी एकमेकांवरच्या टीकाटिपण्ण्या मात्र आता रोजचाच विषय झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या मानेच्या दुखण्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यावरुनही आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

आज कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन केलं. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना खासगी रुग्णालयात दाखल होण्यावरुन टोला लगावला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? याचाच अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होत आहे. मला वैयक्तिक टीका करायची नाही, पण फडणवीस यांना करोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते.

हेही वाचा – “आता राज्य सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी का करत नाही?” चंद्रकांत पाटलांचा सवाल

“आता राज्य सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी का करत नाही?”

“राज्यातील सत्तेतले पक्ष पेट्रोल डिझेलचे कर कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत होते. सगळा स्टंट होता. आता केंद्रानं पेट्रोल-डिझेलवरचा अबकारी कर कमी केला. त्यातून पेट्रोल ५ रुपये तर डिझेल १० रुपये प्रतिलिटर स्वस्त झालं. त्यामुळे प्रत्येक राज्यात अजन एकेक रुपया कमी झाला. त्यानंतर ११ राज्यांनी दर कमी केले. त्यात काँग्रेस शासित राज्य देखील आहेत. महाराष्ट्रात हा व्हॅट पेट्रोलवर २४ टक्के आणि डिझेलवर २५ टक्के आहे. त्याशिवाय ९ टक्के अतिरिक्त सेस आहे. आता बाकीच्या राज्यांप्रमाणे तुमचा ५-१० टक्के का कमी करत नाही? कारण हे पैसे तुमचे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. आज राज्यात किमान १००० ठिकाणी आम्ही निदर्शनं करणार आहोत”, असं पाटील म्हणाले.

“इतकी मुजोरी कुठून येते?”

“मला कळत नाही की इतकी असंवेदनशीलता, मुजोरी कुठून येते? जेवढे दिवस मिळतील तेवढे अन्याय करा, अत्याचार करा. राज्यातलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी तुम्ही खासगी बसेस आणता. मेस्मा कायद्याखाली नोटीसा बजावता. सरकार नोकरांमध्ये सामील करण्यासाठी वेळ लागेल असं तुम्ही म्हणतात. त्या मागणीवर नंतर चर्चा करा. पण त्यांचे १७ महिन्यांचे पगार द्यायचे आहेत”, असंही पाटील म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandrakant patil slams uddhav thackeray why he is not admitted to civil hospital vsk

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या