“आता राज्य सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी का करत नाही?” चंद्रकांत पाटलांचा सवाल

चंद्रकांत पाटील यांनी पेट्रोल-डिझेल दरांवरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

bjp-chandrakant-patil-on-sanjay-raut
(संग्रहीत)

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढत होते. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा अबकारी कर कमी केल्यामुळे त्यापाठोपाठ भाजपशासित राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले. मात्र, आता केंद्रानं कर कमी केल्यानंतरही राज्य सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी का करत नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राज्य सरकारविरोधात कोल्हापुरात आंदोलन करताना त्यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे.

“राज्यातील सत्तेतले पक्ष पेट्रोल डिझेलचे कर कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत होते. सगळा स्टंट होता. आता केंद्रानं पेट्रोल-डिझेलवरचा अबकारी कर कमी केला. त्यातून पेट्रोल ५ रुपये तर डिझेल १० रुपये प्रतिलिटर स्वस्त झालं. त्यामुळे प्रत्येक राज्यात अजन एकेक रुपया कमी झाला. त्यानंतर ११ राज्यांनी दर कमी केले. त्यात काँग्रेस शासित राज्य देखील आहेत. महाराष्ट्रात हा व्हॅट पेट्रोलवर २४ टक्के आणि डिझेलवर २५ टक्के आहे. त्याशिवाय ९ टक्के अतिरिक्त सेस आहे. आता बाकीच्या राज्यांप्रमाणे तुमचा ५-१० टक्के का कमी करत नाही? कारण हे पैसे तुमचे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. आज राज्यात किमान १००० ठिकाणी आम्ही निदर्शनं करणार आहोत”, असं पाटील म्हणाले.

“इतकी मुजोरी कुठून येते?”

“मला कळत नाही की इतकी असंवेदनशीलता, मुजोरी कुठून येते? जेवढे दिवस मिळतील तेवढे अन्याय करा, अत्याचार करा. राज्यातलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी तुम्ही खासगी बसेस आणता. मेस्मा कायद्याखाली नोटीसा बजावता. सरकार नोकरांमध्ये सामील करण्यासाठी वेळ लागेल असं तुम्ही म्हणतात. त्या मागणीवर नंतर चर्चा करा. पण त्यांचे १७ महिन्यांचे पगार द्यायचे आहेत”, असंही पाटील म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandrakant patil targets maharashtra government on petrol diesel prices pmw