“संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुपारी मिळाली आहे”, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी लावला होता. त्यापाठोपाठ आज भाजपा आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात गंभीर आरोप करत पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर कोर्लाईमधील १९ बंगल्यांच्या प्रकरणावरून आरोप केल्यानंतर त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी “मातोश्रीचा पाया उखडण्याचा प्रयत्न” सुरू असल्याचे सूतोवाच केले.
आरोप-प्रत्यारोपांची भाषा खालावली?
राज्यात सध्या खालच्या स्तरावर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले जात असताना त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात आता असं व्यक्तिमत्व शोधावं लागेल की जे अराजकीय असेल आणि त्यांचं म्हणणं सगळ्या राजकीय पक्षांना मान्य होईल. शेवटी लोक निवडून देतात, अशा मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी असते की त्यांनी राज्यात कुठल्या एका पक्षाचं किंवा गटाचं प्रतिनिधित्न न करता सौहार्दानं महाराष्ट्र चालवायचा असतो. त्यांनी सगळ्यांना चर्चेसाठी बोलावलं पाहिजे. पण ते कसे बोलवणार? कारण त्यांच्या सामनामध्ये रश्मी ठाकरे संपादक असून सुद्धा ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, ते पाहाता त्यांनी रश्मी ठाकरेंऐवजी अनिल परब यांना संपादक करायला हवं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.




“अर्थ लावण्यासाठी कुणीतरी अंतर्ज्ञानीच हवा”
संजय राऊतांना आत्ताच १९ बंगल्यांचा विषय काढायची गरज नव्हती, असं पाटील म्हणाले आहेत. “खूपच इंटरेस्टिंग गोष्टी घडतायत. त्यांचा अर्थ लावण्यासाठी कुणीतरी अंतर्ज्ञानीच लागेल. संजय राऊतांनी १९ बंगल्यांचं प्रकरण काढायची काहीच गरज नव्हती. त्यांच्यावर जे आरोप झाले, त्यावर त्यांनी बोलायचं होतं. त्याऐवजी खूप दिवसांपूर्वी आलेल्या १९ बंगल्यांचा विषय त्यांनी काढला. प्रकरण रश्मी ठाकरेंपर्यंत नेलं”, असं पाटील म्हणाले.
“संजय राऊतांना मातोश्री डळमळीत करायची आहे का? संजय राऊत कुणाच्यातरी इशाऱ्यावर चालतात. तो कुणाचा इशारा आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या इशाऱ्यावर ते मातोश्रीचा पाया उखडण्याच्या प्रयत्नात आहेत का? तो उखडून इशारा करणाऱ्यांना मुख्यमंत्री करायचंय का? की इशाऱ्याच्या नावाने संजय राऊतांना मुख्यमंत्री करायचंय का? असे प्रश्न उपस्थित राहात आहेत”, असं पाटील म्हणाले.
शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा?
दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा फार हुशार राजकारणी आहेत. उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना कळतच नाहीये की कसं कठपुतलीच्या खेळाप्रमाणे आपल्याला उचकवलं जातंय. अजेंडा दिला जातोय. हा वर्षानुवर्ष खेळ चाललाय”, असं पाटील म्हणाले. यावेळी पत्रकारांनी आपण शरद पवारांविषयी बोलताय का? अशी विचारणा केली असता त्याला पूर्णपणे नकारही न देता पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं.
“मी कुणाचंही नाव घेतलेलं नाही. महाविकास आघाडी ज्यांनी तयार केली, जे चालवतात त्यांच्याकडून आपण कसे फसले जाणार आहोत, हे वर्षानुवर्ष जे फसवले गेले आहेत, त्यांच्या अनुभवातून शिकायला हवं”, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.