संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून सध्या राज्यातलं वातावरण तापलं आहे. शिवसेनेकडून संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्यास नकार देण्यात आल्यानंतर यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली आहे. संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याबद्दल भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर निशाणा साधला होता. त्यावरून आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरून संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“इतरांनी चोंबडेपणा करू नये”

संभाजीराजेंच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊतांनी इतरांनी चोंबडेपणा करू नये, असं म्हणत भाजपावर टीका केली होती. “चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? त्यांनी २०१९ला आम्हाला दिलेला शब्द मोडल्याबद्दल आधी खुलासा करावा. तेव्हा कुणी शब्द दिला होता आणि कुणी मोडला? हा संभाजीराजे आणि आमच्यातला विषय आहे. इतरांनी चोंबडेपणा करू नये. देवेंद्र फडणवीसांनी संभाजीराजेंना लागणारी ४२ मतं द्यावीत. आमच्या पक्षाच्या निर्णयाबाबत आम्ही त्यांना उत्तर का द्यायचं?” असा सवाल संजय राऊतांनी केला होता.

“मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितलं होतं की…”, राज्यसभा उमेदवारीवरुन संजय राऊतांचा दावा!

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांचं नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्यज्ञान आहे. पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल का? आणि हो… सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला?” असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

शिवसेनेकडून अपक्ष उमेदवारीला पाठिंबा न मिळाल्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी ही राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे.