चंद्रपुरमधील सिरोंचा वनविभागांतर्गत येणाऱ्या कमलापूर वन परिक्षेत्रातील हत्ती कॅम्पमधील अवघ्या चार वर्षांच्या आदित्य नावाच्या हत्तीचा आज सकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

10 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर आदित्य मध्यरात्री चिखलात फसला होता. अथक परिश्रमानंतर 11 जून रोजी सकाळी  सव्वा आठ वाजेच्या दरम्यान त्याला चिखलातून बाहेर काढण्यात आले होते. मात्र, चिखलातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात  तो अत्यवस्थ झाला होता. शिवाय तो खूप थकलेला आणि घाबरलेला होता. तसेच जखमी देखील झाला होता. वन विभागाने त्याच्यावर स्थानिक पशुवैद्यकीय अधिका-यामार्फत उपचार सुरू केले होते. मागील सात-आठ दिवसांंपासून त्याने खाणेपिणेही सोडून दिले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते,अशी माहिती मिळाली आहे.

अखेर आज सोमवारी पहाटे अवघ्या 4 वर्षाच्या आदित्यने अखेरचा श्वास सोडला. वनविभागाने जर विशेष लक्ष देऊन तज्ज्ञ पशुवैदयकीय  अधिका-यांना आणले असते, तर कदाचित आदित्यचा जीव वाचला असता अशी चर्चा कमलापूरात सुरू आहे. आदित्यच्या अकाली मृत्यूची सखोल चौकशी करावी, अशी मागणी गावकाऱ्यांकडून केली जात आहे.