scorecardresearch

चंद्रपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पुलाचा भाग कोसळला, २० जखमी; ४ जणांची प्रकृती गंभीर

६० फूट उंचीवर असलेल्या या पुलावरून अनेक नागरिक जात होते

चंद्रपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पुलाचा भाग कोसळला, २० जखमी; ४ जणांची प्रकृती गंभीर
बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पूलाचा भाग कोसळला

चंद्रपुरातील बल्लारशाहा रेल्वेस्थानकावरील प्रवासी पादचारी लोखंडी पुलाचा काही भाग रविवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कोसळला. या घटनेत १५ ते २० प्रवासी जखमी झाले. यातील तीन ते चार प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

बल्लारपूर जंक्शन महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील रेल्वेस्थानक आहे. रविवारी पाच वाजताच्या सुमारास येथील पादचारी पूल कोसळला. यावेळी रेल्वेस्थानकावर काजीपेठ-पुणे पॅसेंजर ही रेल्वेगाडी आली होती. प्रवाशांची वर्दळ जास्त असल्याने जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक एकवरून तीन आणि चार फलाटाकडे जाण्यासाठी प्रवासी या एकमेव पादचारी पुलाचा वापर करतात.

या अपघातात साची नीलेश पाटील, प्रेम तितरे, चैतन्य मनोज भगत, निधी मनोज भगत, छाया मनोज भगत, नयन बाबाराव भीवनवार, राधेश्याम सिंग, अनुराग खरतड, रिया खरतड, स्विटी खरतड, विक्की जयंत भीमलवार, पूजा सोनटक्के, ओम सोनटक्के जखमी झाले आहेत.

आर्थिक मदतीची घोषणा

या घटनेत गंभीर जखमी झालेल्यांना एक लाख तर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत रेल्वे विभागाकडून केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले. जखमींना आवश्यक सुविधा पुरवण्यात याव्या, अशी सूचना मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला केली. शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले आहेत. दरम्यान, खा. बाळू धानोरकर यांनी या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. आरोग्य विभागाने तातडीने वैद्यकीय यंत्रणा कामी लावावी, अशी सूचना त्यांनी केली. या अपघाताची चौकशी करण्याची मागणी त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 18:35 IST

संबंधित बातम्या