वेकोलिच्या सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत विषारी वायुगळतीमुळे शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास आग लागल्याने ९१ कामगार खाणीत अडकले होते. वेकोलिचे सुरक्षा पथक या कामगारांना ऑक्सिजन किट लावून खाणीतून बाहेर काढत असतानाच २५ कामगार बेशुद्ध झाले. या साऱ्यांना वेकोलिच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.
या भूमिगत कोळसा खाणीतून सकाळी ८ वाजता रात्रपाळीतील कामगार बाहेर पडत असताना त्यांनी खाण व्यवस्थापक कटारियांना विषारी वायुगळती सुरू असल्याची माहिती दिली होती, परंतु या सूचनेकडे दुर्लक्ष करून कटारिया यांनी १०० कामगारांना खाणीत पाठवले. कामगार खाणीत जात नाही, तोच कार्बन डायऑक्साईड व नायट्रोजन वायूचा भडका उडाला आणि खाणीत सर्वदूर आगीचे लोळ उठले.
खाणीत आग लागल्याची माहिती मिळताच चंद्रपूर एरियाचे मुख्य महाव्यस्थापक रमाकांत मिश्रा आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. आगीची माहिती व्यवस्थापक कटारिया यांना असतानाही त्यांनी निष्काळजीपणे कामगारांना खाणीत पाठविल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांची कानउघाडणी करण्यात आली.
सुरक्षा पथकाने ऑक्सिजन किट लावून अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढले. मात्र हे काम सुरू असताना विषारी वायू व आगीच्या धुरामुळे सुमारे २५ कामगार खाणीतच बेशुद्ध पडले. त्यापैकी नरोहर व सचिन कदम या कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
चौकशी करून अहवाल सादर करा -खा. अहीर
या आगीची माहिती मिळताच कोळसा, पोलाद व खाण संसदीय समितीचे अध्यक्ष खासदार हंसराज अहीर यांनी घटनास्थळी भेट देऊन खाणीचे अवलोकन केले. या आगीसंदर्भात त्यांनी वेकोलिचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक रमाकांत मिश्रा व खाण अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेऊन या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले, तसेच कामगारांची रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.