राज्य शासनाने स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) दर ५० टक्क्यांनी कमी केल्यानंतरही चंद्रपूर महापालिकेने एलबीटीत आघाडी घेतली असून महिन्याकाठी ३ कोटी ५० लाख ते ४ कोटीपर्यंत वसुली केली जात आहे. यातील दोन कोटी रुपये मनपाच्या पगारावर खर्च होत असले तरी दीड कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा होत आहेत. वीज केंद्र व बीअर बार, वाईन शॉप सर्वाधिक एलबीटी देणारे ग्राहक ठरले आहेत.
चंद्रपूर महापालिका अस्तित्वात आली तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी स्थानिक संस्था कर अर्थात, एलबीटी लावण्याचे जाहीर केले. मात्र, स्थानिक व्यापाऱ्यांनी एलबीटीला प्रखर विरोध करून २०१२ च्या ऑगस्टमध्ये सलग दहा दिवस बाजारपेठ बंद ठेवली होती. परिणामत: मुख्यमंत्र्यांनी एलबीटीला तीन महिने स्थगिती दिली. मात्र, त्यानंतर राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात एलबीटी लागू केली. प्रखर विरोधानंतरही महापालिकेच्या वसुलीची आकडेवारी बघितली तर व्यापाऱ्यांनी एलबीटीला स्वीकारले. त्याचाच परिणाम आज महिन्याकाठी साडेतीन ते चार कोटी रुपयापर्यंत एलबीटी वसुली केली जात आहे. आज एलबीटी लागू होऊन १५ महिन्याचा अवधी झालेला आहे. या अवधीत महापालिकेने ५० कोटी रुपयावर वसुली केली आहे. आयुक्त प्रकाश बोखड, उपायुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली एलबीटी विभाग प्रमुख देवानंद कांबळे व त्यांच्या पथकाच्या माध्यमातून एलबीटी मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे.
कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महिन्याकाठी किमान साडेतीन ते चार कोटीचा एलबीटी गोळा करावाच लागतो. कारण, यातील २ कोटी रुपये पगारावर खर्च होतात व उर्वरित दडी कोटीची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होते. डिसेंबरमध्ये ३ कोटी ७१ लाख, तर जानेवारीत ३ कोटी ६४ लाखाची वसुली केली आहे. राज्य शासनाने सप्टेंबर २०१२ पासून एलबीटीचे दर ५० टक्क्यांनी कमी केले आहे. त्याचाही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु डिसेंबर व जानेवारीची वसुली बघता कुठलाही परिणाम झाला नाही, असे कांबळे यांनी सांगितले. मनपा क्षेत्रात येणाऱ्या जवळपास ३ हजार ३०० व्यापाऱ्यांनी मनपाकडे नोंदणी केलेली आहे. एलीबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द मनपाने भरारी पथक तयार केले आहे. आतापर्यंत सात जणांना एलबीटी चोरी प्रकरणात दंड ठोठावला असून दीड लाखावर दंड वसूल केला आहे. या शहरातील बहुतांश सर्वच बीअर बार व वाईन शॉपकडून सर्वाधिक एलबीटी वसूल केला जात आहे. महिन्याकाठी किमान २५ ते ३० लाखाचा एलबीटी दारू विक्रेतेच भरतात. यासोबतच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र व शहरातील दुचाकी व चारचाकी शो-रूमकडून मोठा एलबीटी गोळा होत असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.
महापालिकेची हद्द वाढविण्याची मागणी
सध्या तरी एलबीटीची वसुली समाधानकारक असली तरी या शहरात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या बहुतांश शो-रूम महापालिका क्षेत्राबाहेर जात असल्याने त्याचा परिणाम एलबीटी वसुलीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोरवा येथे नुकतेच फोर्ड या मर्सडीज गाडीचे भव्य शो-रूम उघडण्यात आले. यासोबतच पडोली येथे ट्रॅक्टर, हायवा, टाटा, हुंडई कार व अन्य वाहनांचे शो-रूम आहेत. मनपा क्षेत्राबाहेर शो-रूम असल्याने त्यांना एलबीटीपासून मुक्ती आहे, तसेच शहरातील बहुतांश मोठय़ा व्यापाऱ्यांची गोदामेही मनपा क्षेत्राबाहेर असल्यानेच महापालिकेची हद्द वाढविण्यात यावी, अशी मागणी समोर आली आहे.